सहकारी साखर कारखान्यांचे एनर्जी व कॉस्ट ऑडीट- सिंघल Print

विखे कारखान्याचा पहिला हप्ता २ हजार २००- मंत्री विखे
राहाता/वार्ताहर

उसाची एकरी उत्पादकता वाढविण्यासाठी साखर आयुक्तालयाने पाचकलमी कार्यक्रम हाती घेतला आहे. सहकारी साखर कारखान्यांना आता एनर्जी व कॉस्ट ऑडीट करण्याचे धोरण राज्य सरकारने घेतले असून, हे ऑडीट कारखान्यांना सक्तीचे करण्यात आल्याची माहिती राज्याचे साखर आयुक्त विजय सिंघल यांनी दिली. सभासदांना २ हजार २०० रुपये टनाप्रमाणे पहिला हप्ता देण्यात येणार असून कामगारांनाही २० टक्के बोनस देण्याची घोषणा कारखान्याचे मार्गदर्शक व राज्याचे कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी यावेळी केली.
पद्मश्री विखे पाटील कारखान्याच्या ६३ व्या ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ आज सिंघल यांच्या हस्ते झाला. अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे होते. माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, जि. प.च्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे, कामगार नेते अविनाश आपटे, कारखान्याचे अध्यक्ष डॉ. भास्करराव खर्डे, पायरेन्सचे अध्यक्ष एम. एम. पुलाटे, राहाता बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब कडू आदी यावेळी उपस्थित होते.
सिंघल म्हणाले, मागील वर्षी साखर उत्पादनात राज्य देशात प्रथम क्रमांकावर होते. यंदा उसाची कमतरता असल्याने काही कारखाने पूर्ण क्षमतेने चालणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. सहकारी साखर कारखान्याची संख्या कमी होऊन खासगी कारखान्यांची संख्या वाढत आहे. या स्पर्धेमध्ये सहकारी साखर कारखानदारी टिकली पाहिजे. सहकाराची ओळख प्रवरानगरपासून झाली, आज विखे कारखान्यामुळे सहकाराची ओळख देशभर झाली आहे.
ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे म्हणाले, सहकारी चळवळ व कारखान्यांवर हल्ले चालू असून, या गदारोळातून सहकारी चळवळ वाटचाल करीत आहे. साखर कारखान्यांमधील अंतर कमी करणे हा धोक्यांचा कंदील आहे. कोणत्याही नेत्यांचे याकडे लक्ष नाही, कारण त्यांनी खासगी साखर कारखाने काढले आहेत. सहकाराने ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था मजबूत करुन देशाला नवी दिशा दिली. या दिशा मोडून त्यावर घाला घालण्याचे काम चालू आहे. सहकाराचे यश काही लोकांच्या डोळयात खुपते, अशी टीका त्यांनी केली.
मंत्री राधाकृष्ण विखे म्हणाले, मागील वर्षी ऊस भावाची कोंडी आपणच फोडली. याही वर्षी सभासदांना पहिला हप्ता २ हजार २०० रुपये टनाप्रमाणे देऊ, जिल्ह्यातील इतर कारखान्यांनी जादा भाव दिल्यास त्यांच्याहीपुढे विखे कारखाना राहील. जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी सभासद व कामगारांच्या विश्वासामुळे आमचा आत्मविश्वास वाढला. कार्यक्षेत्रात ऊसाचे उत्पादन वाढल्याने सभासदांना जादा भाव देता आला. जुन्या लोकांनी खासगी कारखानदारांना कंटाळून सहकारी साखर कारखाना सुरु केला. त्यामुळे आपण खासगी कारखाना काढणार नाही व बंद पडलेला साखर कारखाना विकत घेणार नाही. कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ७ हजार एकरावर ठिबकसिंचन योजना राबवण्यात येणार असून सभासदांना केवळ ११ हजार रुपये खर्च येणार असल्याचे त्यांनी सांगितले.     

शेतकरी संघटनेचे आंदोलन
चालू गळितास उसाला ३ हजार ५०० रुपये भाव द्यावा, यासह इतर मागण्यांसाठी आज शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली विखे कारखान्याच्या प्रवेशद्वारासमोर घोषणेबाजी करण्यात आली. राधाकृष्ण विखे, सिंघल यांनी कार्यक्रम संपल्यानंतर प्रवेशद्वारावर येऊन शेतकरी संघटनेचे निवेदन स्वीकारले.