एकाच वेळी तीन राज्यांत चित्रप्रदर्शन Print

 अनुराधा ठाकूर यांचा बहुमान
प्रतिनिधी
महाराष्ट्र, आंध्र व दिल्ली या तीन राज्यांत एकाच वेळी फक्त एकटय़ाच्या चित्रांकृतींचे प्रदर्शन होण्याचा बहुमान नगरच्या चित्रकार अनुराधा ठाकूर यांनी मिळवला आहे. ही सर्व चित्र चित्रमालिका या स्वरूपात असून त्यातही पुन्हा आदिवासींच्या जीवनशैलीवर आधारीत आहेत हेही या प्रदर्शनांचे एक अनोखे वैशिष्टय़ आहे. असा मान मिळवणाऱ्या त्या नगरमधील पहिल्याच चित्रकार आहेत.
नवी दिल्ली येथील ललित कला अकादमीत १५ नोव्हेंबपर्यंत त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन आहे. ८ नोव्हेंबरला या प्रदर्शनाचे उद्घाटन दिल्लीच्या चित्रकला क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत होत आहे. या अकादमीत वैयक्तीत चित्रप्रदर्शन होणे ही चित्रकारांच्या दुनियेत अत्यंत मानाची गोष्ट समजली जाते. विशेष स्वरुपाचे काम असल्याशिवाय येथे प्रदर्शनासाठी जागाही मिळत नाही.
हैदराबाद (आंध्र प्रदेश) येथे २८ ऑक्टोबरला त्यांच्या चित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. हे प्रदर्शन २७ नोव्हेंबपर्यंत सुरू राहणार आहे. हैदराबादमधील पंचतारांकित हॉटेल नोवाटेल अशा प्रकारच्या प्रदर्शनासाठी प्रसिद्ध आहे. तिथेच श्रीमती ठाकूर यांचे चित्रप्रदर्शन सुरू आहे. याही प्रदर्शनात आदिवासींच्या चालीरितींचे दर्शन घडवणारी अत्यंत आकर्षक अशी चित्र आहेत.
पुण्यामध्ये नगर रस्त्यावर असलेल्या हयात रिजन्सी येथे उद्या (दि. ७) त्यांच्या चित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन आहे. हे प्रदर्शन ३० नोव्हेंबपर्यंत सुरू राहील. नगरमधील चित्रप्रेमी रसिकांनी पुण्यातील प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन श्रीमती ठाकूर यांनी केले आहे. आदिवासी जीवनाचे विविध रंग या प्रदर्शनातून शहरी लोकांच्या दृष्टीस येत आहेत ही आपल्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे, असे त्यांनी सांगितले.