राष्ट्रपतींच्या हस्ते स्नेहालयला पुरस्कार Print

प्रतिनिधी
महिला सक्षमीकरण व बाल विकास क्षेत्रातील पथदर्शी कार्याबद्दल नगरच्या स्नेहालय संस्थेस नवी दिल्लीत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते ‘डॉ. दुर्गाबाई देशमुख राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. स्नेहालयचे विश्वस्त मिलिंद कुलकर्णी यांनी तो स्वीकारला. ५ लाख रु. सन्मानपत्र व शाल असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
स्नेहालय संस्थेचे अध्यक्ष सुवालाल शिंगवी, कार्याध्यक्ष संजय गुगळे, शोभा साळुंके कार्यक्रमास उपस्थित होते. स्नेहालय गेल्या दोन दशकांपासून लालबत्ती भागातील शोषित महिला, त्यांची बालके, एडस्ग्रस्त महिला, स्त्री भ्रुण हत्या विरोध या प्रश्नावर काम करत आहे, त्याची दखल पुरस्काराच्या स्वरुपात केंद्र सरकारच्या समाजकल्याण मंत्रालयाने घेतली. समाजातील वंचित घटकांसाठी सरकार, खाजगी व स्वयंसेवी संस्था यांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज राष्ट्रपती मुखर्जी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.
कार्यक्रमानंतर स्नेहालयच्या वतीने केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री श्रीमती कृष्णा तिरथ व केंद्रिय समाज कल्याण मंडळाच्या अध्यक्ष प्रेमा करियप्पा यांना शोषित महिला व हक्क वंचित बालकांच्या प्रश्नासंदर्भात निवेदन दिले. पुरस्कारामुळे संस्थेच्या कार्यकर्त्यांची कार्य प्रेरणा प्रबळ होण्याची उमेद मिळाल्याची भावना संस्थेचे सचिव राजीव गुजर यांनी व्यक्त केली.