गोदामातून १२० एलसीडी टीव्ही चोरले Print

प्रतिनिधी
थोडेथोडके नाही तर तब्बल १२० एलसीडी व एलएडी दूरचित्रवाणी संच नागापूर औद्योगिक वसाहतीतील प्लॉट क्रमांक ७९ मधील गोदामातून पळवून नेण्यात आले. चित्रपटातच शोभेल अशा या चोरीचा तपास पोलिसांना अद्याप लागलेला नसून गोदाम मालकानेही कोणावर संशय व्यक्त केलेला नाही.
सोमवारी पहाटे ते आज सकाळच्या दरम्यान ही चोरी झाली. गोदाममालक मनोहर कन्हैयालाल डेमला (वय, ४८ राहणार पंकज कॉलनी, टिव्ही सेंटर, नगर) यांनी यासंदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. डेमला यांचे या प्लॉटवर गोदाम आहे. त्यात त्यांनी सुमारे ५ लाख ५० हजार रूपये किंमतीचे १२० एलसीडी व एलएडी हे अत्याधुनिक दूरचित्रवाणी संच ठेवले होते.
चोरटय़ांनी गोदामाचे कुलूप उचकटून ही चोरी केली. सकाळी गोदामात आल्यावर डेमला यांना गोदामात चोरी झाल्याचे समजले. चोरटय़ांनी बरोबर एलसीडी व एलएडी दूरचित्रवाणी संचच चोरून नेले आहेत. प्रत्येक संच बॉक्समध्ये असतो. त्या बॉक्सचा आकार व एकूण संख्या पाहता मोठय़ा गाडीतून हे संच नेले असावेत हे स्पष्ट आहे. त्यादृष्टीने तपास सुरू आहे, असे एमआयडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी सांगितले.