नियोजन समिती बैठकीला आचारसंहितेचा धाक Print

प्रतिनिधी
आधीच अनियमीत असलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीवर आता ग्रामपंचायत निवडणुकीच्या आचारसंहितेची संक्रात आली आहे. मात्र, जिल्ह्य़ाच्या सन २०१३-१४ च्या वार्षिक प्रारूप आराखडय़ास मंजुरी घ्यायची असल्याने विनाप्रसिद्धी व आचारसंहिता क्षेत्रासाठी  नव्या योजना जाहीर न करता ८ नोव्हेंबरला नियोजन भवनात ही बैठक होणार आहे.
पालकमंत्री बबनराव पाचपुते यांच्या व्यस्ततेमुळे जिल्हा नियोजन समितीच्या बैठका अत्यंत अनियमीत होत चालल्या असल्याचे सदस्यांचे म्हणणे आहे. त्यातच समितीला महिलांसाठीचे ५० टक्के आरक्षण लागू करायचे असल्याने जिल्हा परिषद क्षेत्रातून निवडून द्यायच्या तब्बल ३३ सदस्यांच्या जागा रिक्त आहेत. फार टिका होऊ लागल्याने समितीचे अध्यक्ष असलेल्या पालकमंत्री पाचपुते यांनी ९ नोव्हेंबरला समितीची बैठक जाहीर केली. नंतर ती तारीख बदलून ८ नोव्हेंबर केली. आता या बैठकीवर निवडणूक आचारसंहितेचे र्निबध आले आहेत. त्यामुळे या बैठकीत फक्त जिल्ह्य़ाच्या वार्षिक प्रारूप आराखडय़ास मंजूरी दिली जाईल, अन्य कोणताही विषय घेण्यात येणार नाही व त्यावरची चर्चाही प्रसिद्ध केली जाणार नाही असे जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार यांनी कळवले आहे. ग्रामपंचायत निवडणूकीची आचारसंहिता असल्याने नियोजन समितीची बैठक घ्यावी की घेऊ नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाचे मार्गदर्शन मागवले होते. आयोगाने काही अटींवर बैठकीस परवानगी दिली. त्यात प्रामुख्याने आचारसंहिता क्षेत्राकरता नव्या योजना जाहीर करू नयेत, पालकमंत्री समितीमधील निर्णय जाहीर करणार नाहीत, राजकीय स्वरूपाचे भाषण कोणालाही करता येणार नाही या अटींचा समावेश आहे. आचारसंहिता क्षेत्रापैकी एखाद्या भागात दुष्काळ किंवा पाणी टंचाई असेल तर त्यावरच्या उपाययोजना राबवण्यात अडथळा नाही, असे आयोगाने कळवले असल्याची माहिती डॉ. संजीवकुमार यांनी दिली.