बंद छावण्या पुन्हा सुरू करण्याचे आदेश- पाचपुते Print

प्रतिनिधी
लोकप्रतिनिधींच्या परवानगीशिवाय जनावरांच्या छावण्या बंद करू नयेत तसेच थोडा पाऊस झाला म्हणून बंद करण्यात आलेल्या छावण्याही पुन्हा सुरू करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिल्याचे पाचपुते यांनी सांगितले. बुऱ्हाणनगर (नगर) व मिरी-तिसगाव (पाथर्डी) या प्रादेशिक पाणी योजनांचे थकित ९५ लाख रुपयांचे वीज बील सरकारने भरावे असा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
जिल्हा नियोजन समितीच्या सभेनंतर पत्रकारांना पालकमंत्री पाचपुते यांनी ही माहिती दिली. जिल्ह्य़ात सध्या उपलब्ध असलेला ऊस चाऱ्यासाठी राखीव ठेवायचा की साखर कारखाने चालवायचे याचा निर्णय दिवाळीनंतर घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. पुढील पाच-सहा महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्य़ास २२ लाख मेट्रिक टन चाऱ्याची आवश्यकता भासेल, काही ठिकाणी पाऊस झाल्याने ज्वारीचा कडबा चाऱ्यासाठी मिळेल, मागील वर्षी ११४ लाख मेट्रिक टन उस जिल्ह्य़ात होता, यंदा अवघा ६५ ते ७० लाख मेट्रिक टन आहे.
काही ठिकाणी पाऊस झाला तरी तो पुरेसा नाही, त्यामुळे पाऊस झाला म्हणून बंद करण्यात आलेल्या नगरमधील ४ व श्रीगोंद्यातील ३ छावण्या पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिल्याचे सांगताना पाचपुते यांनी कर्जत तालुक्यातील बंद छावण्याबाबत मात्र उत्तर दिले नाही. बुऱ्हाणनगर व मिरी-तिसगाव या प्रादेशिक योजना जि. प.कडे हस्तांतरीत झाल्या आहेत, मात्र आत्तापर्यंत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजना चालवत होती, त्याकाळातील दोन्ही योजनांचे थकित वीज बिलाचे ९५ लाख रुपये टंचाई निधीतून भरण्याबाबत आपले पाणी पुरवठा मंत्री व संबंधित विभागाशी बोलणे झाले आहे, याबाबत दोन दिवसांत निर्णय होईल, सध्या या योजनांचा वीजपुरवठा खंडित केलेला आहे, दोन्ही योजनांचा ७० गावांना फायदा होत असल्याने टँकरने पाणी पुरवठा करण्यास त्यापेक्षा अधिक खर्च येणार आहे, त्यामुळे तसा प्रस्ताव सरकारकडे पाठवल्याचे पाचपुते यांनी सांगितले.
नगर शहराजवळील बुरुडगावला महापालिकेने पाणी पुरवठा करावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत, येत्या १० दिवसांतील पुरवठा पाहून ग्रामस्थ पैसे भरतील, त्याबाबत आमदार शिवाजी कर्डिले मनपा व ग्रामपंचायत यांची बैठक घेतील, असेही पाचपुते यांनी सांगितले.