मनपा भाजप गटनेतेपदी सचिन पारखी Print

प्रतिनिधी
महापालिकेतील भारतीय जनता पक्षाच्या गटनेतेपदी नगरसेवक सचिन सुभाषचंद्र पारखी यांची निवड झाली. स्थायी समितीचे सभापती म्हणून निवड झाल्यावर बाबासाहेब वाकळे यांनी या पदाचा राजीनामा दिला होता व त्यानंतर हे पद रिक्तच होते.
पक्षाचे शहराध्यक्ष मिलिंद गंधे यांनी पारखी यांची निवड जाहीर केली. पारखी हे पक्षाचे जुने, निष्ठावान कार्यकर्ते आहेत. संघटनात्मक कामात गेली अनेक वर्षे ते सक्रिय असून बऱ्याच निवडणुकांमध्ये त्यांनी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. त्यामुळेच त्यांची मनपावर या पंचवार्षिकमध्ये स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड करण्यात आली होती. आता त्यांना पक्षाचे गटनेतेपदही मिळाले आहे.
मनपा सभागृहात पारखी यांच्याकडून अनेक विषयांवर अभ्यासपूर्ण भाषण करण्यात येते. नेप्ती चौक ते पत्रकार चौक या रस्त्याच्या कामातील भ्रष्टाचार उघडकीस आणण्यात पारखी यांचा मोठा वाटा होता. पक्षाच्या सर्व नगरसेवकांनी पारखी यांच्या निवडीबद्दल आनंद व्यक्त केला. शहर सरचिटणीस जगन्नाथ निंबाळकर, उपाध्यक्ष विनोद बोथरा, उदय अनभुले, प्रविण ढोणे, आशाताई विधाते यांनी पारखी यांचे अभिनंदन केले आहे.