५० वर्षांच्या लढय़ाची यशस्वी सांगता Print

मुख्यमंत्री करणार खंडकऱ्यांची दिवाळी गोड
श्रीरामपूर/प्रतिनिधी
स्वातंत्र्यानंतर गेली पन्नास वर्षे सुरू असलेल्या खंडकरी शेतकऱ्यांच्या लढय़ाची सांगता आता होत आहे. खंडकऱ्यांना जमिनीचे वाटप येत्या सोमवारी (दि. १२) सकाळी ९ वाजता मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते होत असून शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.
शेती महामंडळाच्या खंडकरी शेतकऱ्यांचा लढा १९५२ ला सुरू झाला. सुरूवातीला भास्कररराव गलांडे व अण्णासाहेब शिंदे यांनी लढय़ाचे नेतृत्व केले. सूर्यभान वहाडणे यांनीही लढय़ात मोठे योगदान दिले. त्यानंतर गेली ५५ वर्षे माधवराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली खंडकऱ्यांचा लढा सुरू होता. कमाल जमीन धारणा कायद्याच्या मर्यादेपर्यंत खंडकऱ्यांना जमिनीचे वाटप केले जाणार आहे. हरेगाव मळ्याचा नकाशा प्रसिद्ध करण्यात आला. जमीन वाटपाची यादी निश्चित करण्यात आली. आता मोजणीच्या कामास प्रारंभ झाला आहे. प्रातिनिधीक स्वरुपात हरेगाव मळ्यावरील काही शेतकऱ्यांना मुख्यमंत्री चव्हाण यांच्या हस्ते सात-बाराचे उतारे दिले जाणार आहेत, अशी माहिती खंडकरी कृती समितीचे निमंत्रक अण्णासाहेब थोरात यांनी दिली.
कार्यक्रमास माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जिल्ह्य़ाचे पालकमंत्री बबनराव पाचपुते, खंडकरी कृती समितीचे अध्यक्ष माधवराव गायकवाड, कृषिमंत्री राधाकृष्ण विखे, माजी खासदार बाळासाहेब विखे, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी खासदार गोविंदराव आदिक, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे, आमदार भाऊसाहेब कांबळे उपस्थित राहणार आहेत. शासकीय पातळीवर कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे. तहसील कार्यालयानजीक जमीन वाटपाचा कार्यक्रम होईल. त्यापूर्वी मुख्यमंत्री चव्हाण हे हरेगाव व उंदिरगाव येथे जाऊन वाटप करण्यात येणाऱ्या जमिनीची पाहणी करणार आहेत. कार्यक्रमास मोठय़ा
संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन खंडकरी कृती समितीचे निमंत्रक थोरात, त्रिंबक कुऱ्हे, कारभारी थोरात आदींनी केले आहे.    
२५ वर्षांनी काढणार दाढी
खंडकऱ्यांचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत खंडकरी कार्यकर्ते रामदास बांद्रे यांनी दाढी काढणार नाही, अशी प्रतिज्ञा केली होती. त्यानुसार गेली पंचवीस वर्षे त्यांची वाढलेली दाढी आहे. चळवळीतील सर्वात ज्येष्ठ व वयोवृद्ध कार्यकर्ते ते आहेत. आता जमीन वाटप होणार असल्याने त्यांची प्रतिज्ञा पूर्ण होऊन गोड यश आले आहे.