खंडकरी जमीन वाटपातील टोळ्यांचा हस्तक्षेप थांबवा Print

खा. वाकचौरे यांची मागणी
प्रतिनिधी
खंडकरी जमीन वाटपाच्या प्रक्रियेत काही पैसेवाल्या टोळ्यांनी हस्तक्षेप सुरू केला असून तो थांबवावा व ही प्रक्रिया अधिकाधिक पारदर्शक व्हावी, अशी मागणी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली.
खंडकरी जमीन वाटपाचा निर्णय हा अनेकांच्या केलेल्या संघर्षांतून झाला आहे. या जमिनी ६० वर्षांपूर्वी गावाच्या बाहेर होत्या. आता त्या शहराच्या मध्यवर्ती भागात आल्या आहेत. त्यामुळेच त्यांच्या किमती वाढल्या आहेत. त्यावर डोळा ठेवून काही भांडवलदार, बांधकाम व्यावसायिक जमीन वाटप प्रक्रियेत हस्तक्षेप करत असून त्यांना काही अधिकाऱ्यांचाही वरदहस्त मिळतो आहे, अशी तक्रार वाकचौरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. याबाबत यापूर्वीही तक्रार केली असल्याकडे त्यांनी त्यांचे लक्ष वेधले.
जमिनींचे मालक असलेल्यांशी संपर्क साधून पैशाच्या जोरावर त्यांना गंडवण्याचा उद्योग फार मोठय़ा प्रमाणावर सुरू झाला आहे. प्रशासनाला आदेश देऊन याला आळा घालावा, प्रक्रिया अधिकाधिक पारदर्शी करावी, त्यात होणारा अन्याय दूर करावा, अशी मागणी करून वाकचोरे यांनी याकडे दुर्लक्ष झाल्यास सेनेच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.