कराड-बेळगाव रेल्वेमार्गाबाबत हरकती पाठविण्याचे आवाहन Print

कोल्हापूर / प्रतिनिधी
इचलकरंजीहून जाणारा प्रस्तावित कराड-बेळगाव रेल्वेमार्गाचा नकाशा मुख्य अभियंता, सेंट्रल रेल्वे यांनी जाहीर केला असून याबाबत काही हरकती/सूचना असल्यास देण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी याबाबत काही हरकती असल्यास दाखल कराव्यात, असे आवाहन आमदार सुरेश हाळवणकर यांनी केले आहे.
कराड-बेळगाव रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण करण्याची बाब सन २०११-११२ च्या रेल्वे बजेट दरम्यान रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी घोषणा केल्यावर पुढे आली. त्यापूर्वीच आमदार सुरेश हाळवणकर यांनी मार्च २०१० मध्ये रेल्वेमंत्र्यांना पत्र लिहून किलरेस्करवाडी ते बेळगाव असा रेल्वे मार्ग सुचविला होता. त्यानंतर इचलकरंजीतील रेल्वेसाठी कृती समिती स्थापन झाल्यानंतर आमदार सुरेश हाळवणकर यांनी वेळोवेळी केंद्र शासनाकडे पत्रव्यवहार केला होता. तसेच परळी-बीड रेल्वेमार्गाच्या धर्तीवर राज्य शासनाने ५० टक्के निधी निधी प्रदान करावा, अशीही मागणी राज्य शासनाकडे कपात सूचनेद्वारे केली होती.    
दरम्यान, कराड-बेळगाव रेल्वे मार्गाचा तात्पुरता नकाशा सेंट्रल रेल्वेचे उपमुख्य अभियंता (कन्स्ट्रक्शन) सुरेश पाखरे यांनी जाहीर केला असून त्याबाबते पत्र आ. हाळवणकर यांना आज प्राप्त झाले.
त्यामध्ये कराड-शेनोली-तांबवे-इस्लामपूर-वाळवा- आष्टा-दुधगाव-कुंभोज-हातकणंगले-इचलकरंजी-कारदगा-ममदापूर-निपाणी-संकेश्वर-हलकर्णी-दड्डी-हंडीग्नूर-आंबेवाडी-बेळगाव असा मार्ग या नकाशामध्ये प्रस्तावित केला आहे. या नकाशाचा अभ्यास करून काही सूचना-हरकती असल्यास ३० ऑक्टोबरपूर्वी कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.