ऊस उत्पादकांची २४ ऑक्टोबर रोजी नगरला परिषद Print

कोल्हापूर / प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने उस उत्पादकांची राज्यव्यापी परिषद अहमदनगर येथील सहकार सभागृहात २४ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता आयोजित केली आहे.
या परिषदेला मार्गदर्शन करण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेचे सरचिटणीस कॉ. अतुलकुमार अंजान, माजी साखर संचालक श्री.के.इ. हरिदास, कष्टकऱ्यांचे नेते कॉ.गोविंद पानसरे प्रमुख पाहुणे म्हणून हजर राहणार आहेत.
मागील वर्षी जाहीर केलेला अडीच हजार रुपयांचा दर कोणत्याही साखर कारखान्यांनी अद्याप दिला नाही. अशातच नवा हंगाम सुरू होण्याचे बिगूल वाजत आहेत. अशावेळी ऊसकरी शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च प्रचंड वाढला आहे. खतांचे दर, डिझेलचे दर, बियाणे, औषधांचे दर, शेतीचा खंड प्रचंड वाढला आहे. या संदर्भात प्रतिटन २ हजार ५०० रुपये पर्यंत सध्या उत्पादन खर्च गेला आहे. स्वामिनाथन कमिटीच्या शिफारशीच्या प्रमाणे उत्पादन खर्च अधिक ५० टक्के एवढा उसाला दर दिला पाहिजे व पहिला अ‍ॅडव्हान्स त्याच्या ८० टक्के दिला पाहिजे, याबाबतचा ठराव या परिषदेत मांडला जाणार आहे.
सध्या सहकार मोडून काढण्याचे धोरण शासनाने घेतले आहे. भ्रष्टाचारातून मिळविलेल्या पैशातून सहकाराचे खासगी मालकीत रूपांतर होत आहे. जागतिकीकरणाच्या काळात या भ्रष्ट सहकाराला नवा पर्याय भ्रष्टाचारमुक्त सहकार बनवणे त्यासाठी सहकार कायद्यात आमूलाग्र बदल करण्याची आवश्यकता आहे. या बाबतही या परिषदेत निर्णय घेतला जाईल.
सर्व ऊसकरी शेतकऱ्यांनी या परिषदेस हजर राहावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य किसान सभेचे जनरल सेक्रेटरी कॉ.नामदेव गावडे यांनी केले आहे. कोल्हापूर जिल्ह्य़ातून ५०० शेतकरी या परिषदेस हजर राहतील, असा विश्वास कॉ.राम कळंबेकर यांनी व्यक्त केला. कोल्हापूर जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांनी १३ ऑक्टोबर २०१२ रोजी दुपारी २ वाजता रेल्वे स्टेशनवर अहमदनगरला जाण्यासाठी हजर राहावे, असे   आवाहन कॉ. संजय पाटील यांनी केले आहे.