सोलापूर जिल्ह्य़ात ग्रामपंचायत निवडणुका; ४७६ जागांसाठी ९०६ उमेदवार रिंगणात Print

अकरा ग्रामपंचायती बिनविरोध
सोलापूर /प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्य़ातील ५६ ग्रामपंचायत निवडणुकीत ४७६ जागांसाठी ९०६ उमेदवार रिंगणात आहेत. अकरा ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध ठरल्या. दक्षिण सोलापूर तालुक्यातील निंबर्गी येथे केवळ एका जागेसाठी निवडणूक होत आहे.
बिनविरोध निवडणुका झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये सलगर, आंदेवाडी, रुद्देवाडी, खानापूर व हालचिंचोळी (ता. अक्कलकोट), बसवनगर (ता. दक्षिण सोलापूर), भांडेगाव (ता. बार्शी), कुरणवाडी (ता.मोहोळ), दहिगाव (ता.करमाळा), अनकढाळ (ता. सांगोला) व रहाटेवाडी (ता. मंगळवेढा) या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ७४२ जणांनी माघार घेतली. त्यामुळे ४७६ जागांसाठी आता ९०७ उमेदवार िरगणात उतरले आहेत.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील सात ग्रामपंचायतींच्या ५२ जागांसाठी २६७ उमेदवारीअर्ज दाखल होते. त्यापैकी १३० जणांनी माघार घेतली. २६ जागा अविरोध ठरल्या. तर उत्तर सोलापूर तालुक्यात दोन ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी ४८ उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे ४३ उमेदवार िरगणात उतरले आहेत. मोहोळ तालुक्यातील ३७ जागांसाठी ६१ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. माढा तालुक्यात सहा ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत ५८ जागांसाठी १२२ उमेदवार आहेत.
तर माळशिरस तालुक्यात काळमवाडी ग्रामपंचायतीत सात जागांसाठी १४ उमेदवार राहिले आहेत. महाळुंगसह वाघोली, भांबुर्डी नातेपुते आदी ठिकाणी पोटनिवडणुका होत आहेत.
अक्कलकोट तालुक्यात २० ग्रामपंचायतींच्या १६६ जागांसाठी ४८५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी २११ अर्ज मागे घेण्यात आले. चार ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून उर्वरित चार ग्रामपंचायतींमध्ये १३ जागा अविरोध झाल्या आहेत. बार्शी तालक्यात तीन ग्रामपंचायतींच्या २१ जागांसाठी ४४ अर्ज दाखल करण्यात आले होते.
त्यापैकी नऊ जणांनी माघार घेतली. यात भांडेगाव ग्रामपंचायत बिनविरोध झाली असून उर्वरित दोन ग्रामपंचायतींसाठी ३४ उमेदवार राहिले आहेत.