सतेज पाटील गटाचे ५९ उमेदवार ‘कोल्हापूर दक्षिण’ मध्ये बिनविरोध Print

ग्रामपंचायत निवडणूक
कोल्हापूर / प्रतिनिधी
कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत गृहराज्यमंत्री सतेज पाटील गटाचे ५९ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी बिनविरोध निवडीचे चित्र स्पष्ट झाले. यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीपाठोपाठ ग्रामपंचायत निवडणुकीतही भरीव यश मिळवून गृहराज्यमंत्री पाटील यांनी मतदार संघावरील पकड मजबूत केली आहे. या यशस्वी सुरूवातीमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.
सध्या सर्वत्र ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम सुरू आहे. उमेदवार निवडीवरून चुरस सुरू असतांना मंत्री पाटील यांनी आपल्या मतदार संघातील जास्तीत जास्त जागा बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले. गावच्या विकासाचा मुद्दा इच्छुक उमेदवारांना पटवून देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यांच्या या प्रयत्नांना अर्ज माघारीच्यादिवशी यश आले आहे. त्यांचा विकासाचा मुद्दा पटल्याने अनेक इच्छुकांनी स्वखुशीने माघार घेऊन योग्य व सक्षम उमेदवारांच्या बिनविरोध निवडीला पाठबळ दिले. कनेरीवाडी येथे अदृश्य काडसिध्देश्वर स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व ११ ठिकाणी बिनविरोध निवडी झाल्या. तर हणबरवाडी सर्व ७ पैकी ७, वसगडे १६ पैकी१२, कणेरी १३ पैकी ११, मोरेवाडी १२ पैकी ५, कळंबे तर्फे ठाणे १७ पैकी ४, नेर्ली-विकासवाडी १३ पैकी४, गोकुळ शिरगांव २ तर उचगाव, उजळाईवाडी व वळीवडे प्रत्येकी एक असे उमेदवार बिनविरोध निवडूनआले. बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांचा सत्कार गोकुळचे संचालक बाबासो चौगुले यांच्या हस्ते झाला.
या वेळी नगरसेवक भरत रसाळे, उदय जाधव, जि.प.सदस्य एकनाथ पाटील, पं.स.सदस्य दिलीप टिपुगडे, सचिन पाटील, युवराज गवळी, बजरंग रणदिवे, डी. डी. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.