‘कर्नाटक’च्या गळचेपीच्या निषेधार्थ पश्चिम महाराष्ट्रात कडकडीत बंद Print

पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको
कोल्हापूर / प्रतिनिधी, शुक्रवार, १२ ऑक्टोबर २०१२

मराठी भाषकांची गळचेपी करण्याचा कर्नाटक शासनाच्या धोरणाच्या निषेधार्थ गुरुवारी शिवसेनेच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला कोल्हापूर, सांगली, सातारा या तिन्ही जिल्हय़ांमध्ये बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. बंद काळात कोल्हापूरमध्ये बस, रिक्षा, दुकाने यांची मोडतोड करण्याचा प्रकार घडल्याने हिंसक वळण मिळाले. तर पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कोगनोळी येथे शिवसैनिक व महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी सुमारे दोन तास रास्ता रोको आंदोलन केल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. रास्ता रोको करणारे शिवसेनेचे विधान परिषद गटनेते आमदार दिवाकर रावते यांच्यासह २००हून अधिक कार्यकर्त्यांना दुपारी ४ वाजता अटक करण्यात आली.
कर्नाटक शासनाने बेळगावजवळ विधानसौधची उभारणी केली आहे. राष्ट्रपतींच्या हस्ते आज उद्घाटन समारंभ आयोजित केला होता. या कार्यक्रमास शिवसेना व महाराष्ट्र एकीकरण समितीने जोरदार विरोध दर्शविला होता. विरोधाचा भाग म्हणून कोल्हापूर, सांगली, सातारा या तीन जिल्हय़ांमध्ये बंदचे आवाहन करण्यात आले होते. या बंदला सर्व स्तरातून चांगला प्रतिसाद मिळाल्याने बंद यशस्वी ठरला.     
    कोल्हापुरातील शिवाजी चौक येथे शिवसेनेचे नेते व शिवसैनिक जमले होते. त्यांनी बंदचे आवाहन करणारी रॅली काढली. तत्पूर्वी सकाळपासूनच बहुतांशी व्यवहार बंद होते. शहर बससेवा व रिक्षा बंद असल्यामुळे बंदचा परिणाम जाणवू लागला होता. रॅली निघाल्यानंतर सुरू असलेली तुरळक दुकानेही झटपट बंद झाली.
दरम्यान, बंद काळात काही हिंसक घटना घडल्या. लक्ष्मीपुरीतील फोर्ड कॉर्नर येथे एसटीवर दगडफेक करण्यात आली. सुमारे १०हून अधिक सुरू असलेल्या रिक्षांवर दगडफेकीचा प्रकार घडला. लक्ष्मीपुरीतील एका मिठाईच्या दुकानाची तोडफोड करण्यात आली. महाद्वार रोडवर फळ व भाजीपाला विक्रेत्यांच्या साहित्याची नासधूस करण्यात आली. व्हीनस कॉर्नर ते दसरा चौक मार्गावर असणाऱ्या पेट्रोल पंपावर दगडफेक करण्यात आली. अशाच प्रकारच्या घटना शहरात अन्यत्र काही ठिकाणी घडल्या असल्याचे वृत्त आहे.
दरम्यान, बंदचे आवाहन करीत शिवसेनेची रॅली जुन्या पुणे-बेंगलोर महामार्गावर आली. हॉटेल व्हिक्टर पॅलेस येथे असलेल्या एका मोटारीच्या शो रूमवर दगडफेकीचा प्रकार घडला. त्यामुळे पोलिसांनी कार्यकर्त्यांवर सौम्य लाठीमार केला. त्यातून आंदोलक व पोलीस यांच्यात शाब्दिक वाद झाला. बंदचे सक्तीने आवाहन केल्याच्या कारणावरून पोलिसांनी रणजित आयरेकर व अमोल भुरडे या दोघांना अटक केली.
सांगली येथेही बंदला प्रतिसाद मिळाला. सांगली जिल्हा शिवसेनाप्रमुख संजय सुतार, उपजिल्हाप्रमुख अजिंक्य पाटील, महिला आघाडी संघटक सुवर्णा मोहिते आदींच्या नेतृत्वाखाली दुचाकीवरून रॅली काढण्यात आली. रॅली निघाल्याचे पाहून सुरू असलेली दुकाने ताबडतोब बंद करण्यात आली. कोणताही अनुचित प्रकार न घडता बंद यशस्वी ठरल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात आला.    कर्नाटक शासनाच्या दंडेलशाहीचा निषेध नोंदविण्यासाठी कोगनोळी येथे शिवसैनिक व महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने रास्ता रोकोचे आयोजन करण्यात आले होते. पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कोगनोळी येथे शिवसैनिकांच्या साथीला महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते व नागरिक उतरल्याने या आंदोलनाला ताकद मिळाली.
कर्नाटक शासनाच्या निषेधाच्या घोषणा देत सुमारे दोन तासांहून अधिक काळ रास्ता रोको सुरू राहिल्याने महामार्गावरील दोन्ही बाजूला वाहनांची लांबलचक रांग लागली होती. दुपारी साडेतीनच्या सुमारास पोलिसांनी आमदार दिवाकर रावते, अरुण दुधवाडकर, आमदार राजेश क्षीरसागर, जिल्हाप्रमुख विजय देवणे, कमलाकर किलकिले, संजय पवार आदींना अटक केली.