पारंपरिक लोककलांच्या स्पर्धाना महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद Print

चार हजार महिलांचा सहभाग
कोल्हापूर / प्रतिनिधी
धनंजय महाडिक युवाशक्ती महिला आघाडी प्रेरित, भागीरथी महिला संस्था पारंपरिक लोककला स्पध्रेला हजारो महिलांनी गर्दी करून, उत्स्फूर्त प्रतिसाद देण्याची परंपरा याही वर्षी कायम राखली. चार हजारांहून अधिक महिलांनी या स्पध्रेत सहभाग घेतला. फुगडी, झिम्मा, घागर घुमविणे, उखाणे, सूप नाचविणे, छुई फुई अशा विविध पारंपरिक लोककला आणि खेळांमध्ये महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
महिलांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी, पारंपरिक लोककला स्पध्रेचे आयोजन करण्यात आले होते. ‘लेक वाचवा’ अभियानामध्ये सहभागी होत प्रबोधनात्मक संदेश देत, पॅव्हेलियन हॉटेलमध्ये या स्पध्रेला प्रारंभ झाला.
महापौर कादंबरी कवाळे, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या उपाध्यक्ष सरला पाटील, उगार महिला मंडळाच्या अध्यक्ष स्मिता महाडिक यांच्या हस्ते आणि भागीरथी संस्थेच्या अध्यक्ष अरुंधती महाडिक, पंजाब महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या व्यवस्थापिका मीना किंकर यांच्या प्रमुख उपस्थितीत देवीचे पूजन करून आणि दीपप्रज्वलनाने स्पध्रेला प्रारंभ झाला.
या प्रसंगी प्रायोजक ओम साई एंटरप्रायजेसचे अशोक गाडे यांचा सत्कार करण्यात आला.
 सुमारे स्पध्रेसाठी एकूण सव्वा लाख रुपयांची बक्षिसे जाहीर करण्यात आली होती. याशिवाय गिफ्ट कूपन देऊन अनेक प्रोत्साहनात्मक बक्षिसेही होती. स्पध्रेत सहभागी प्रत्येक महिलेला प्रमाणपत्र देण्यात आले.
अनेक महिलांनी आपल्या खेळातून लेक वाचवा, झाडे लावा, प्रदूषण टाळा असा सामाजिक संदेश दिला. निवेदनात वैविध्यता आणत संवाद साधत, ऐश्वर्या बेहेरे, योगिता जाधव, ताज मुल्लाणी, राधिका कुलकर्णी, सत्यजित कोसंबी यांनी वेगळाच रंग भरला.