कार्तिकी यात्रेतील घोडाबाजार यंदा पंढरीत पुन्हा भरणार Print

पंढरपूर/वार्ताहर
कार्तिकी यात्रेतील आकर्षण असलेला घोडय़ांचा बाजार यंदा पूर्वीप्रमाणेच भरवण्याचा निर्णय पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीने घेतला असून व्यापाऱ्यांनी आपले घोडे बाजारात घेऊन येण्याचे आवाहन सभापती भगवान चौगुले यांनी केले  आहे.
पंढरीत भरणाऱ्या कार्तिकी यात्रेतील घोडेबाजार हे आजवर आकर्षण राहिलेले आहे. पण काही कारणामुळे हा घोडेबाजार अकलूज येथे भरू लागल्याने कार्तिकी यात्रेची शानच लुप्त पावली होती. दरवर्षी या बाजारात सोलापूरबरोबरच अन्य जिल्ह्य़ातूनही घोडे विक्रीस आणले जात. याबरोबरच गाय, म्हैस, बैल, शेळ्यांचाही मोठा बाजार भरत असे. या बाजारातील आर्थिक उलाढाल मोठी होती. कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने पंढरीत आलेले अनेकजण या बाजारात घोडे खरेदी-विक्री करत. केवळ हा बाजार पाहण्यासाठी म्हणून या काळात येथे येत असत. परंतु गेल्यावर्षीपासून हा बाजार पंढरपूरऐवजी अकलूजला भरू लागल्याने अनेकजण नाराज होते. तो यंदाच्या वर्षीपासून पुन्हा भरवण्याची मागणी अनेकांनी केली होती. यानुसार यंदा १९ ते २८ नोव्हेंबर दरम्यान हा घोडेबाजार पूर्वीप्रमाणे भरणार आहे. यासाठी सुरक्षा, वीज, पाणी, जनावरांवर औषधोपचार अशा सोयी उपलब्ध करून देण्याचे आदेश माजी आमदार सुधाकर परिचारक यांनी दिले आहेत.