सीमावर्ती भागातील कन्नड विद्यार्थ्यांचा उद्या सोलापुरात गुणगौरव सोहळा Print

सोलापूर /प्रतिनिधी
कर्नाटक शासनाच्या कन्नड अभिवृद्धी प्राधिकार (बंगळुरू) व सोलापूर जिल्ह्य़ातील नागणसूरच्या श्री गुरू बमलिंगेश्वर कल्याण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या रविवारी, १४ ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता कन्नड माध्यमातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ मीठ गल्लीतील शिवानुभव मंगल कार्यालयात आयोजिला आहे.
होटगी मठाचे तपोरत्नम् योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या सान्निध्यात व नागणसूर मठाचे श्रीकंठ शिवाचार्य महास्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली कन्नड अभिवृद्धी प्राधिकारचे अध्यक्ष तथा कन्नड अभिनेते मुख्यमंत्री चंद्रू यांच्या प्रमुख उपस्थितीत हा समारंभ आयोजिला आहे. आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते व माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांच्या अध्यक्षतेखाली आयोजिलेल्या या समारंभात सोलापूरसह अक्कलकोट, जत, मुंबई, पुणे, सांगली आदी भागातील १०२ कन्नड माध्यम शाळांतील दहावी व बारावीच्या ३१३ गुणवंत विद्यार्थ्यांना प्रत्येकी आठ हजारांपासून ते सहा हजारांपर्यंत शिष्यवृत्ती देऊन सन्मानित केले जाणार आहे. शिवाय प्रमाणपत्र, इंग्रजी शब्दकोश, घडय़ाळ, शालेय दफ्तर व पेन आदी साहित्यही विद्यार्थ्यांना अदा करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांनाही प्रवास खर्च अदा केला जाणार आहे. याबाबतची माहिती नागणसूरचे श्रीकंठ शिवाचार्य महास्वामीजींनी पत्रकार परिषदेत दिली.
या समारंभास आमदार विजय देशमुख, कन्नड अभिवृध्दी प्राधिकारचे सचिव डॉ. के. मुरलीधर, जिल्हाधिकारी गोकुळ मवारे, सोलापूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. इरेश स्वामी, सोलापूर सिद्धेश्वर सहकारी बँकेचे संचालक सिद्धय्या हिरेमठ, सिद्धाराम साबळे, नागेंद्र कुलकर्णी आदी उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागातील कन्नड माध्यमाच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता तथा भाषा बंधुभाव वाढविणे, मराठी व कन्नड भाषेची देवाण-घेवाण होणे व त्यातून संस्कृती, ज्ञानाचा विकास होण्यासाठी दरवर्षी हा उपक्रम राबविला जातो, असे श्रीकंठ शिवाचार्य महास्वामीजींनी सांगितले. या पत्रकार परिषदेस चिदानंद वनारोटे, बसवराज सावळगी, बसवराज स्वामी खंडाळ, कल्याण शास्त्री आदी उपस्थित होते.