कृषी प्रदर्शनाचे आज कराडमध्ये उद्घाटन Print

शेतीविषयक  माहितीचा मोठा खजिना  
कराड/वार्ताहर
कृष्णा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर उद्या शनिवार (दि. १३ ) पासून तीन दिवस आयोजित कृषिमहर्षी आबासाहेब मोहिते शेती प्रदर्शनाची तयारी पूर्ण झाली असून, प्रदर्शनात २०० दालने आहेत. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ ही संकल्पना घेण्यात आली आहे. प्रदर्शनासाठी ४० हजार सभासदांना घरपोच निमंत्रणे पाठवण्यात आल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष अविनाश मोहिते, शेतीमित्र अशोकराव थोरात यांनी दिली. कृष्णा कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भास्करराव जाधव, कृष्णा कारखान्याचे उपाध्यक्ष सुरेश पाटील या वेळी उपस्थित होते.   
कृष्णा साखर कारखाना कार्यस्थळावर १३ ते १५ ऑक्टोबर दरम्यान, दुसऱ्या कृषिमहर्षी आबासाहेब मोहिते कृषी औद्योगिक व पशू प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन काडसिध्देश्वर महाराज यांच्या हस्ते व कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांच्या उपस्थितीत होईल.
कृषी प्रदर्शनात कृषीविषयक उत्पादने, स्पर्धा, शेतकरी मेळावा याची माहिती देण्यात येईल. २०० वेगवेगळे स्टॉल्स त्यात
लावण्यात येतील. पहिल्या दिवशी ऊस पीक स्पर्धा, दुसऱ्या दिवशी १४ ऑक्टोंबरला पशू प्रदर्शन, भाजीपाला, पालेभाज्या व फळे स्पर्धा आणि तिसऱ्या व अखेरच्या दिवशी १५ ऑक्टोबरला श्वान प्रदर्शन, स्पर्धा बक्षीस वितरण आणि प्रदर्शनाचा समारोप होईल.
प्रदर्शनात कृषी औजारे, यंत्रे, पशू व पक्षीपालन, दुग्ध उत्पादने, वनीकरण, बियाणे, अन्न प्रक्रिया, पॅकिंग, शीतगृहे, सेंद्रिय शेती व जैव तंत्रज्ञान, मत्स्य उद्योग, हरितगृहे, रेशीम उद्योग, जलसिंचन पद्धती आदी विषयक माहिती दिली जाईल.