इचलकरंजीच्या नगराध्यक्षांचा राजीनामा शहराध्यक्षांकडे सादर Print

कोल्हापूर/प्रतिनिधी
इचलकरंजीच्या नगराध्यक्षा रत्नप्रभा भागवत यांनी शहराध्यक्ष अशोक आरगे यांच्याकडे राजीनामा सादर केला असला, तरी त्यांच्या राजीनाम्याबाबत कमालीची गुप्तता पाळली जात आहे. या राजीनाम्याची चर्चा असली, तरी प्रत्यक्षात वाच्यता होत नसल्याने त्याबाबत संभम्रावस्था निर्माण झाली आहे. दरम्यान, नगराध्यक्षा भागवत यांच्या राजीनाम्यावर येत्या दोन दिवसांत निर्णय घेण्यात येईल. त्यानंतर नवीन नगराध्यक्ष निवडण्यासाठी पक्षाची बठक होऊन पक्षश्रेष्ठी पुढील दिशा ठरवतील असे शहराध्यक्ष अशोक आरगे यांनी सांगितले.
नगराध्यक्षा भागवत यांनी पक्षाच्या शहराध्यक्षांकडे दिल्याचे वृत्त पसरले. तशा आशयाचे वृत्तही प्रसिद्ध झाले. या राजीनाम्याची चर्चा सुरू असतानाच नगराध्यक्षा भागवत आज नेहमीप्रमाणे नगरपालिकेत आल्या. त्यांनी आपले कामकाजही पाहिले. नगराध्यक्षांसह अन्य नगरसेवकही पालिकेत आले असले, तरी त्यांनी राजीनाम्याबाबत बोलणे मात्र उघडपणे टाळले. नगराध्यक्षपदाच्या दावेदार असलेल्या सुप्रिया गोंदकर, सुमन पोवार, बिस्मिला मुजावर व प्रमिला जावळे यांच्यासह काही नगरसेवक व नगरसेविकांचे पतिराज आज नगरपालिकेत येऊन गेल्याने तोही चच्रेचा विषय होता.
 दरम्यान शहर काँग्रेस भवनात झालेल्या शहर कार्यकारिणी, पदाधिकारी व नगरसेवकांच्या बठकीत ज्येष्ठ नेते माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी चांगलीच कानउघडणी केली. सोमवारी पालिकेवर उद्भवलेला जप्तीचा प्रसंग केवळ उपनगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांनीच हाताळला. या संदर्भातही काँग्रेस सदस्यांनी दाखविलेल्या अनास्थेबद्दल नाराजी व्यक्त केली. विरोधी पक्षाचे नगरसेवक कोणत्याही प्रश्नावर नेहमीच सतर्क असतात, तशीच सजगता काँग्रेसच्या नगरसेवकांनी दाखवावी, असे खडे बोल सुनावले.