फेरफार नोंदीची पुस्तके गहाळ झाल्याने शेतक ऱ्यांची गैरसोय Print

आंदोलनाचा इशारा
सोलापूर /प्रतिनिधी
मोहोळ तालुक्यातील देगाव येथे जमिनीच्या फेरफार नोंदीची सहा पुस्तके मोहोळ तहसील कार्यालयातून गेल्या सहा महिन्यांपासून गहाळ झाली आहेत. याप्रकरणी संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सोलापूर जिल्हा जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा मोहोळ तालुका पंचायत समितीचे सदस्य प्रभाकर देशमुख यांनी केली आहे. संबंधितांवर कारवाई न झाल्यास देगाव तलाठी कार्यालयास कोणत्याही क्षणी टाळे ठोकण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
यासंदर्भात जिल्हाधिकारी व मोहोळ तहसीलदारांना देशमुख यांनी निवेदन सादर केले आहे. त्यांच्या निवेदनानुसार देगाव (वाळूज) येथील तहसील अभिलेखमधून फेरफार क्रमांक १ ते १७९, ६९२ ते ७९२, ७९३ ते ८९३, ९९४ ते ११०४ आणि ११०५ ते ११७९ अशी सहा पुस्तके गहाळ झाली आहेत. ही सहा पुस्तके निवासी नायब तहसीलदारांनी अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे तपासणीसाठी दिली होती, अशी माहिती मिळते.
जिल्हाधिकारी कार्यालयातून १ सप्टेंबर २०१२ रोजी अपर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे लेखी पत्र देऊन विचारणा केली असता सदर पुस्तके तेथे नसल्याचे कळविण्यात आले. याप्रकरणाचे गांभीर्य प्रशासकीय यंत्रणेला नसल्याचा आरोप देशमुख यांनी केला आहे. फेरफार नोंदीची सहा पुस्तके गहाळ झाल्यामुळे संबंधित शेतकऱ्यांची मोठी कुचंबणा होत आहे. त्यांची बँक प्रकरणे, शासकीय लाभाची प्रकरणे, विहिरी खोदणे अशा अनेक कामांसाठी शेतकरी अडचणीत आले आहेत. या प्रश्नावर लाक्षणिक उपोषणही करण्यात आले. परंतु त्याची दखल घेतली नसल्याचे निवेदनात नमूद केले आहे.