सोलापूर शहराला ‘फ्लेक्स’चा वेढा Print

जाहिरात फलकांवरही अतिक्रमण
सोलापूर /प्रतिनिधी
शहराचे सौंदर्य नष्ट करणाऱ्या ‘फ्लेक्स’ फलकांचे सध्या सर्वत्र मोठय़ा प्रमाणात पेव फुटले आहे. यावर पायबंद घालण्यासाठी महापालिका प्रशासनाने धोरण आखले असले तरी त्यात कृतीचा अभाव दिसून येतो. त्यामुळे ‘फ्लेक्स’ फलकांचे फुटलेले पेव कमी न होता उलट, अधिकृत वाणिज्य जाहिरात फलकांवरही आता मोठय़ा प्रमाणात अतिक्रमणे करू लागले आहे. यात दंडेलशाही तथा गुंडगिरी बळावत चालली आहे. मात्र, यासंदर्भात पालिका व पोलीस प्रशासन एकमेकांवर जबाबदारी ढकलत असल्याने संबंधितांवर कारवाई करणार का, हा प्रश्न अनुत्तरित राहिला आहे.
शहरात ‘फ्लेक्स’चे वाढलेले प्रमाण रोखण्यासाठी व पर्यायाने शहराचे सौंदर्य जपण्यासाठी पालिका प्रशासनाने अलीकडेच विविध सात चौकात ‘फ्लेक्स’ फलक झळकावण्यास बंदी घातली आहे. या बंदीचे नव्याचे नऊ दिवसही उलटत नाहीत, तोच पुन्हा ‘फ्लेक्स’चे पेव फुटू लागले आहे. यात जाहिरात फलक (होर्डिग) व्यावसायिकांच्या व्यवसायावर गंडांतर आले आहे. त्यामुळे दाद कोणाकडे मांडायची हा प्रश्न पडला आहे. त्याबाबतचे गाऱ्हाणे व्याणिज्य जाहिरात फलक व्यावसायिक संघटनेने पत्रकार परिषदेत मांडले.
राजकीय नेत्यांचे वाढदिवस, थोर पुरूषांच्या जयंती, स्मृतिदिन, सण, उत्सव, निवड, नियुक्तया, मिरवणुकांच्या नावाखाली प्रमुख चौकात, रहदारी असलेल्या सार्वजनिक रस्त्यांवर ‘फ्लेक्स’ लावण्याचे प्रमाण वाढले असून त्यातून काहीवेळा कायदा व सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण होतो. तसेच या माध्यमातून गुंड, समाजकंटकांच्या छबी ‘फ्लेक्स’वर पाहावयास मिळतात. त्यामुळे शहराची सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक अभिरूची कोणत्या थराला पोहोचली, याचेही प्रत्यंतर येते. या प्रश्नावर तक्रारी वाढल्याच्या पाश्र्वभूमीवर गेल्या ७ सप्टेंबर रोजी महापौर अलका राठोड यांनी स्थानिक आमदारांसह पालिकेचे पदाधिकारी, नगरसेवक, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व नेते, पालिकेचे आयुक्त व प्रशासनाची बैठक घेऊन डिजिटल फलकांबाबत ठोस निर्णय जाहीर केले होते. यापुढे अशा प्रकारचे ‘फ्लेक्स’ लावले जाऊ नयेत याची सवरेपोतरी दक्षता घेण्यात येईल,असे सर्वानुमते ठरले होते. त्याचे सर्व थरातून स्वागत झाले. हा निर्णय होऊन नव्याचे नऊ दिवस उलटत नाहीत, तोच शहरात पुन्हा ठिकठिकाणी डिजिटल फलकांचे पेव फुटू लागले. दरम्यान, गणेशोत्सव काळात वाणिज्य जाहिरात फलकांवर अतिक्रमण करून अनधिकृतपणे लावण्यात आलेले ‘फ्लेक्स’ पालिका व पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीने काढून घेण्यात आले होते. तथापि, आता पुन्हा ‘फ्लेक्स’चे अतिक्रमण वाढले आहे. गेल्या काही दिवसात किमान २५ ठिकाणी अशी अतिक्रमणे झाली आहेत.
पांजरापोळ चौक, सरस्वती चौक, मेकॅनिक चौक,महात्मा गांधी रोड, टिळक चौक आदी भागात वाणिज्य जाहिरात फलकांवर वाढदिवस, तसेच धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे ‘फ्लेक्स’ बळजबरीने व दमदाटी करून लावण्यात आले आहेत. त्यास हरकत घेतली असता, ‘कोणाच्या परवानगीची गरज नाही, पोलिसांना आम्ही बघून घेऊ, आमचे नेते महापालिकेतच आहेत, आम्ही ‘फ्लेक्स’ लावणारच, तुम्हाला काय करायचे ते करा,’ असा सज्जड दम दिला जातो. एवढेच नव्हे तर, ‘‘फ्लेक्स’काढून घेण्याबाबत जास्त बोलणार असाल तर तुम्हाला जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या खोटय़ा आरोपात गुंतवू’,असेही धमकावले जाते. यासंदर्भात फौजदार चावडी पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दिली असता पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने न घेता अदखलपात्र गुन्हा नोंद केल्याचे वाणिज्य जाहिरात फलक व्यावसायिक संघटनेचे प्रमुख संदीप जव्हेरी व स्वरूप स्वामी यांनी सांगितले.
सध्या गुन्हेगारप्रवृत्तीच्या तथाकथित नेत्यांचे ‘फ्लेक्स’चे अतिक्रमण करून झळकावण्यात आले असून त्याबाबत तक्रार करूनदेखील दाद घेतली जात नसल्याने आता या प्रश्नावर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महापालिकेसमोर उपोषण करावे लागेल,असा इशाराही जव्हेरी यांनी दिला. या पत्रकार परिषदेस जाहिरातदारांपैकी हितेश शहा, प्रकाश मोगरकर, सुहास हजारे, उदय धुमाळ, सतीश डोमनाळे, गुरूदत्त चव्हाण, कल्पेश शहा आदी उपस्थित होते.