अजय देवगण, काजोल महालक्ष्मीच्या दर्शनास Print

कोल्हापूर / प्रतिनिधी    

शारदीय नवरात्रोत्सव सुरू होण्यास तीन दिवसांचा अवधी राहिला असतानाच करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीच्या दर्शनासाठी सेलिब्रिटींची गर्दी आत्तापासूनच होऊ लागली आहे. शुक्रवारी सुप्रसिध्द हिंदी चित्रपट अभिनेता अजय देवगण व त्याची पत्नी चित्रतारका काजोल यांनी महालक्ष्मीचे दर्शन घेतले. देवगण दाम्पत्याचा दौरा अत्यंत गोपनीय ठेवण्यात आला होता. करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मंदिरामध्ये शारदीय नवरात्रोत्सवाच्या तयारीला वेग आला आहे नियोजनावर अखेरचा हात फिरविण्यामध्ये प्रशासन, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती व श्रीपूजक व्यग्र झाले आहेत. अशातच शुक्रवारी अभिनेता अजय देवगण हा पत्नी काजोलसह श्री महालक्ष्मी मंदिरात दाखल झाला.त्यांच्या कोल्हापूर भेटीची तसेच दर्शनाची कोणालाही कल्पना दिलेली नव्हती.
त्यामुळे देवगण उभयता मंदिरात आल्याचे सुरूवातीला फारसे कोणाला कळले नाही.मंदिरात आल्यावर अजय देवगण व काजोल यांनी महालक्ष्मीचे दर्शन घेतले. श्रीपूजकांनी त्यांना तीर्थप्रसाद दिला. या दोघांचीही मंदिरात काहीकाळ उपस्थिती होती. मात्र मंदिर परिसरात अजय देवगण व काजोल आले असल्याचे समजल्यावर तेथे गर्दी होऊ लागली. गर्दीच्या कचाटय़ात सापडण्यापूर्वीच उपस्थितांकडे हास्यकटाक्ष टाकत अजय देवगण व काजोल मंदिरातून निघून गेले.
त्यांच्यासाठी खास सुरक्षा पुरविण्यात आल्याने बघ्यांचा त्रास त्यांना फारसा सोसावा लागला नाही. डी.वाय.पाटील प्रतिष्ठानच्यावतीने त्यांच्या दर्शनाची सोय करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. डी.वाय.पाटील विद्यापीठाचे डॉ.संजय पाटील यांचे सुपुत्र व गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचे पुतणे, युवानेते ऋतुराज पाटील हे देवगण पती-पत्नीसमवेत होते. देवस्थान समितीच्यावतीने देवगण यांचे स्वागत करण्यात आले.