तेरा महिन्यांच्या चिमुरडीवर विकृत तरुणाचा बलात्कार Print

जनवादी महिला संघटनेची निदर्शने
सोलापूर /प्रतिनिधी
सोलापुरात लष्कर भागातील फक्रुद्दीननगर झोपडपट्टीत एका विकृत तरुणाने शेजारी राहणाऱ्या अवघ्या तेरा महिन्यांच्या चिमुरडीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली. संबंधित तरुणाला सदर बझार पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, या संतापजनक घटनेच्या निषेधार्थ शुक्रवारी दुपारी अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या सोलापूर शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्यात आली.
फक्रुद्दीननगर झोपडपट्टीत शेजारी राहणाऱ्या तेरा महिन्याच्या एका चिमुरडय़ा मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी विशाल शिवाजी कांबळे (वय २९) यास पोलिसांनी अटक केली असून त्याची रवानगी पोलीस कोठडीत झाली आहे.
आजीच्या मांडीवर बसलेल्या सदर मुलीला विशालने खाऊ देतो असे सांगून उचलून नेले. त्याने स्वत:च्या घरात अन्य कोणीही नसल्याची संधी साधून सदर तेरा महिन्यांच्या मुलीवर बलात्कार केला. मुलीच्या शरीरातून रक्त येऊ लागल्याने ती रडू लागली. नंतर हा बलात्काराचा प्रकार उघडकीस आला. सदर पीडित मुलीच्या आईने सदर बझार पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार विशाल यास अटक करण्यात आली.
दरम्यान, या संतापजनक घटनेच्या निषेधार्थ अ. भा.जनवादी महिला संघटनेच्या सोलापूर शाखेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. या आंदोलनाचे नेतृत्व नगरसेविका शेवंता देशमुख व माजी नगरसेविका नसीमा शेख यांनी केले. निवासी उपजिल्हाधिकारी पराग सोमण यांना भेटून निवेदन सादर करण्यात आले.