बेळगावात मराठी भाषकांची गळचेपी करण्याचा कुटिल डाव - माणिकराव ठाकरे Print

सोलापूर /प्रतिनिधी
सीमावर्ती बेळगाव परिसरात कर्नाटक सरकार व कन्नडिगांकडून मराठी भाषकांची गळचेपी करण्याचा कुटिल डाव खेळला जात असल्याचा आरोप करीत, या प्रश्नावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस बेळगावच्या मराठी भाषकांच्या पाठीशी असल्याची ग्वाही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दिली.
राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीचे सरकार असून हे दोन्ही पक्ष तुल्यबळ आहेत. त्यामुळे दोन्ही एकमेकांचे प्रतिस्पर्धी जरूर आहेत, परंतु एकमेकांचे शत्रू नाहीत, असा निर्वाळाही ठाकरे यांनी दिला.
शुक्रवारी सोलापूरच्या भेटीवर आले असता सकाळी सोलापूर श्रमिक पत्रकार संघात आयोजिलेल्या वार्तालाप कार्यक्रमात ठाकरे यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका स्वबळावर लढविण्याबाबत चर्चा सुरू असून सामान्य कार्यकर्त्यांच्या तशा भावना आहेत. मात्र त्याबाबतचा अिंतम निर्णय नवी दिल्लीत पक्षश्रेष्ठीच घेतील, असा खुलासाही त्यांनी केला.
वाढत्या महागाईमुळे सामान्यांचे जगणे मुश्लिकीचे झाले असताना काँग्रेसचे धोरण ‘आम आदमी के साथ’ कसे, या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, महागाईचे समर्थन कोणीच करू  शकत नाही. मात्र काही अपरिहार्य परिस्थितीमुळेच काही कटू निर्णय शासनाला घ्यावे लागले. त्याची जाणीव जनतेला आहे. त्यामुळे काँग्रेसचे धोरण ‘आम आदमी के साथ’ असल्याचा पुनरूच्चार ठाकरे यांनी केला. केंद्र सरकारला पाठिंबा देण्याबद्दल मायावती व मुलायमसिंग यांची धरसोडीची भूमिका नाही. त्यामुळे केंद्र सरकारला धोका नाही. लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका होण्याची शक्यता अजिबात नसल्याचे मतही त्यांनी स्पष्ट केले.
केंद्राने अनुदानित स्वयंपाक गॅस सिलेंडरमध्ये कपात केल्यानंतर उर्वरित तीन गॅस सिलेंडर अनुदानित तत्त्वावर देण्याबद्दल राज्यातील काँग्रेस-राष्ट्र्वादी आघाडीचे शासन बांधील आहे. त्याबाबत प्रदेश काँग्रेसचा आग्रह कायम असून त्यावर लवकरच निर्णय अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी दुग्धविकासमंत्री मधुकरराव चव्हाण यांच्यासह आमदार प्रणिती शिंदे, आमदार दिलीप माने, महापौर अलका राठोड, माजीमंत्री आनंदराव देवकते, माजी आमदार प्रकाश यलगुलवार, निर्मला ठोकळ, विश्वनाथ चाकोते, प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा कमल व्यवहारे, पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके, शहराध्यक्ष धर्मा भोसले आदी उपस्थित होते.