हौतात्म्य प्राप्त झालेल्या पोलिसांना आदरांजली Print

कोल्हापूर/प्रतिनिधी
कर्तव्य बजावत असताना हौतात्म्य प्राप्त झालेल्या पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या स्मृतिदिनानिमित्त गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी रविवारी स्मृतिस्तंभावर पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. याप्रसंगी पोलीस दलाच्या वतीने बंदुकीच्या तीन फैरींची सलामी देण्यात आली. पोलीस बँड पथकाने बिगुल वाजवून मानवंदना दिली.
गृहराज्यमंत्री सतेज पाटील या वेळी म्हणाले, सध्या पोलिसांना नुसतीच कायदा व सुव्यवस्था पाहावी लागत नसून गुन्हेगार, दहशतवाद आणि समाजद्रोही यांच्याशीची सामना करावा लागतो. कायद्याचे पालन करणाऱ्या नागरिकांचे सुरक्षा व संरक्षण करण्याचे महान कर्तव्य करीत असताना दरवर्षी अनेक पोलीस अधिकाऱ्यांना व शिपायांना आपले प्राण गमवावे लागतात.
या दिवशी त्यांच्या या सर्वोत्तम त्यागास व कर्तव्य बजावत असताना प्राप्त झालेल्या वीरगतीस मानवंदना दिली जाते.
कसबा बावडा येथील पोलीस मुख्यालयातील पोलीस कवायत मैदानावर पोलीस स्मृतिदिन साजरा करण्यात आला. स्मृतिदिनाच्या कार्यक्रमाला  कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक तुकाराम चव्हाण, जिल्हा पोलीसप्रमुख विजयसिंह जाधव, अतिरिक्त पोलीस अधीक्षक एस. डी. तेरवाडकर यांनी पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहिली. याप्रसंगी परिविक्षाधीन उपअधीक्षक डी. व्ही. गिरे, पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी, पोलीस कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.