‘किशोरवयीन मुलींच्या आईनी त्यांची मैत्रीण बनावे’ Print

राजलक्ष्मी माने-पाटील यांचे आवाहन
सोलापूर/प्रतिनिधी
उद्याच्या भारताच्या निर्मितीकेंद्र असणाऱ्या किशोरवयीन मुलींनी शारीरिक वाढीकडे दुर्लक्ष न करता त्यातील अडचणी नि:संकोचपणे किमान आईला तरी सांगाव्यात व मातांनीही मुलींची मैत्रीण बनून त्या समजून घ्याव्यात, असे आवाहन माळशिरस पंचायत समितीच्या सभापती राजलक्ष्मी माने-पाटील यांनी केले.
पंचायत समितीच्या राजप्रिया अभियानांतर्गत पं. स. आरोग्य विभाग ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्र माणकीच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील माणकी येथे गरोदर माता व किशोरवयीन मुलींचा मेळावा आयोजित केला होता; त्या वेळी मार्गदर्शन करताना सौ. माने पाटील बोलत होत्या. अध्यक्षस्थानी जि. प. सदस्य बाबाराजे देशमुख होते. प्रतिमापूजन, सत्कारादी सोपस्कारानंतर माणकी प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी रामचंद्र मोहिते यांनी प्रास्ताविक केले.
पुढे बोलताना माने-पाटील म्हणाल्या, की मुळात समाजात मुलीच्या वाढीकडे, तिच्या आहाराकडेच दुर्लक्ष होते.
त्यात किशोर वयातील मुली लाजाळू असतात. त्या भावी भारताच्या माता असल्याने सक्षम भावी भारतीयांच्या या माताही तेवढय़ाच सक्षम असायला हव्यात. प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या मागे तिच्या कुटुंबाची साथ मोलाची ठरते. त्यामुळे या मुलींच्या आरोग्याकडे कुटुंबानेच लक्ष दिले पाहिजे. शासनामार्फत शासकीय दवाखान्यात सर्वतोपरी उपचाराच्या सुविधा पुरविल्या जात आहेत. मात्र त्या सुविधा घेण्याची नागरिकांची मानसिकता नाही.मुलींची संख्या घटल्याने त्यांच्या सुरक्षिततेची गरज आहे. गरोदर मातांनी जननी सुरक्षा योजनेचा लाभ घ्यावा.किशोरी व गरोदर मातांनी हिमोग्लोबिनसाठी पूरक व संतुलित आहाराकडे लक्ष द्यावे असेही आवाहन त्यांनी केले.
या वेळी गटविकास अधिकारी डॉ. तानाजी लोखंडे, तालुका आरोग्य अधिकारी अनिरूद्ध पिंपळे उपस्थित होते. संग्राम खावरे यांनी आभार मानले.