जमिनीच्या कारणावरून राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला Print

सोलापूर /प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक नागेश विठ्ठल गायकवाड (४०) यांच्यावर काल सोमवारी सायंकाळी रेल्वे स्थानकाजवळील त्यांच्या संपर्क कार्यालयात प्राणघातक हल्ला करण्यात आला. यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जमिनीच्या कारणावरून झालेल्या या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी सातजणांना अटक केली आहे.
नागेश गायकवाड हे रामवाडी भागातील भटक्या वसाहतीत राहतात. गेल्या १६ ऑक्टोबर रोजी घटस्थापनेच्या दिवशी रात्री गायकवाड यांचे दुसऱ्या एका गटाबरोबर भांडण झाले होते. परंतु हे प्रकरण पोलिसात न नेता आपापसात मिटविण्यात आले होते. त्यानंतर काल सोमवारी सायंकाळी गायकवाड यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. या घटनेशी पूर्वीच्या भांडणाचा कितपत संबंध होता, याचा तपास पोलीस करीत आहेत.
गायकवाड हे रेल्वे स्थानकाजवळील आपल्या संपर्क कार्यालयात सहकारी कार्यकर्त्यांशी गप्पा मारत बसले होते. त्यावेळी त्यांच्यावर पाळत ठेवून हा हल्ला करण्यात आला. लोखंडी रॉड, हॉकी स्टिक, बेसबॉल स्टिक व दांडक्यांनी करण्यात आलेल्या हल्ल्यात गायकवाड यांच्या डोक्याला मोठी दुखापत झाली. विजापूर रस्त्यावर सोरेगाव हद्दीत रोहित प्रकाश बोलगमवार यांची दोन हेक्टर जमीन नागेश गायकवाड यानी कुलमुखत्यार होऊन ताब्यात घेतली होती. त्यामुळे चिडून त्यांच्यावर दुसऱ्या गटाने प्राणघातक हल्ला केला. हल्लेखोर गायकवाड यांच्या घराजवळील भागातच राहणारे आहेत. रेवण गायकवाड, नागनाथ गायकवाड, विकी जाधव, सिध्दू गायकवाड आदी आठजणांविरुध्द सदर बझार पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविण्यात आली असून यापैकी सातजणांना पोलिसांनी अटक केल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, या घटनेच्या पाश्र्वभूमीवर रामवाडी-माजी गुन्हेगार भटक्या वसाहतीत टोळीयुध्दाचा भडका उडू नये म्हणून पोलिसांनी बंदोबस्त वाढविला आहे.