विजयादशमीच्या सोहळ्यासाठी करवीरनगरी सज्ज Print

कोल्हापूर / प्रतिनिधी ,
विजयादशमीच्या सोहळ्याची करवीरनगरीत तयारी पूर्ण झाली आहे. अवघे कोल्हापूर सिमोल्लंघनासाठी सज्ज झाले आहे. तिरुपती बालाजीकडून आलेला शालूचा वापर करून करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीची पूजा केली जाणार आहे.
कोल्हापुरात विजयादशमीच्या सोहळ्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. दसरा चौकामध्ये सिमोल्लंघनाचा शाही सोहळा साजरा केला जातो. या सोहळ्यात श्रीमंत शाहू महाराज, युवराज मालोजीराजे, युवराज संभाजीराजे यांच्यासह छत्रपती घराण्यातील पूर्ण परिवार उपस्थित असतो. शाहू महाराजांच्या हस्ते शमीच्या पानांचे पूजन विधीवत केले जाते. त्यांच्या हस्ते पूजा झाल्यानंतर सोने लुटण्यासाठी उपस्थितांची मोठी गर्दी होते. श्रीमंत शाहू महाराज यांना दसऱ्याच्या शुभेच्छा देण्यासाठी कोल्हापूरकरांची झुंबड उडते. दसरा चौकात सायंकाळच्या सुमाराला हा विधी पार पडतो. त्यानंतर महालक्ष्मी मंदिराकडे तीन मानाच्या पालख्या निघतात. श्री महालक्ष्मीची पालखी थेट मंदिराकडे जाते, तर श्री भवानी देवीची पालखी सामाजिक सलोख्याचा संदेश देत सिध्दार्थनगरातून पुढे महालक्ष्मी मंदिरात जाते. त्याशिवाय गुरू महाराजांची पालखी येथूनच निघते. महालक्ष्मी मंदिरात विजयादशमीचा उत्सव विविध धार्मिक उपक्रमांनी पार पडतो. तिरुपती बालाजी येथून महालक्ष्मीसाठी मानाचा शालू पाठविण्यात आला आहे. सुमारे ५० हजार रुपये किमतीच्या या शालूव्दारे महालक्ष्मीला सजविले जाते. सोनेरी किनारपट्टी असलेल्या शालूवर फुलांच्या वेलीचे नक्षीकाम आहे. शालूच्या पदराला भरझरी बुट्टे तसेच सिल्कचा वापर करून शालूचे सौंदर्य वाढविले आहे. दरम्यान विजयादशमीच्या खरेदीसाठी आज बाजारात गर्दी झाली होती. फळे, फुले यांचे दर वधारले होते. झेंडूच्या फुलांना मोठी मागणी होती. ५० ते ६० रुपये किलोदराने ही फुले विकली जात होती. उसाची खरेदीही करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. बिंदू चौक, शिवाजी पुतळा, महाव्दार रोड, जोतिबा रोड आदी ठिकाणी पूजेच्या साहित्यांची विक्री करण्यासाठी विक्रेत्यांनी ठाण मांडले होते.