‘स्वयंसेवी संस्थांनी पारदर्शक कारभार केल्यास सकारात्मक प्रतिमा शक्य’ Print

सोलापूर /प्रतिनिधी
स्वयंसेवी संस्थांनी आपल्या उद्देशानुसार सेवाभावी उपक्रम राबवताना त्यात पारदर्शक व चोख कारभार करावा. मिळालेल्या शासकीय निधीचा देणग्यांचा सेवाभावी उपक्रमासाठीच सदुपयोग करावा. तरच जनमानसात स्वयंसेवी संस्थांची सकारात्मक प्रतिमा तयार होऊ शकेल, असे मत प्रा. डॉ. श्रीकांत येळेगावकर यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्य समाजकल्याण बोर्डाने सोलापूर व उस्मानाबाद जिल्हय़ातील स्वयंसेवी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसाठी आयोजिलेल्या एकदिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन प्रा. डॉ. येळेगावकर यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजिलेल्या या कार्यशाळेस चांगला प्रतिसाद मिळाला. या वेळी व्यासपीठावर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी दीपक ढेपे, श्याम पाखरे, समाजकल्याण बोर्डाचे सहायक प्रकल्प अधिकारी एम. आर. बालूरकर, प्रा. चित्तरंजन जोशी, डॉ. विजया महाजन, प्रा. आर. एम. काझी आदींची उपस्थिती होती. बालूरकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
उद्घाटनपर भाषणात प्रा. डॉ. येळेगावकर यांनी स्वयंसेवी संस्थांनी आपला कारभार पारदर्शक व खऱ्या अर्थाने सेवाभावी वृत्तीने चालविला तर अशा संस्थांना मिळणाऱ्या मदतीचा ओघ आणखी वाढतो, असे मत मांडले. प्रा. चित्तरंजन जोशी यांनी या कार्यशाळेचे कौतुक केले. विजया महाजन यांनी ‘स्वयंसेवी संस्थांच्या कार्यातील लोकसहभागाचे महत्त्व’ या विषयावर मांडणी केली. तर डॉ. बाहुबली दोशी यांनी ‘मुलींच्या घटत्या प्रमाणाचे दुष्परिणाम’ या विषयावर चिंतन केले. याशिवाय प्रा. काझी यांनी ‘स्वयंसेवी संस्थांचे यशस्वी संचलन’ या विषयावर मार्गदर्शन केले. तर दीपक ढेपे (महिला व बालकासंबंधी शासकीय योजना), अ‍ॅड. सरोजिनी तमशेट्टी (महिलाविषयक कायदे) यांनी कार्यशाळेत मार्गदर्शन केले. मोहन सौंदाणे यांनी सूत्रसंचालन तर दत्तात्रेय बनसोडे यांनी आभार मानले.