सीमोल्लंघनाचा सोहळा इचलकरंजीत उत्साहात Print

कोल्हापूर / प्रतिनिधी
वस्त्रनगरी इचलकरंजी येथे बुधवारी सीमोल्लंघनाचा सोहळा उत्साहात पार पडला. मराठा विकास संघटना व सार्वजनिक दसरा महोत्सव समिती यांच्या वतीने आयोजित केलेल्या या सोहळ्यासाठी नागरिकांनी नाटय़गृहचौक परिसरात गर्दी केली होती.
संस्थान काळामध्ये इचलकरंजीत राजेशाही स्वरूपात दसरा साजरा केला जात होता. बरीच वर्षे ही परंपरा खंडीत झाली होती. मराठा विकास संघटना व सार्वजनिक दसरा महोत्सव समिती यांनी केले. त्याकरिता मेट्रो हायटेक टेक्सटाईल पार्कचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी पुढाकार घेतला.
दसरा महोत्सवअंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. दुपारी ३ वाजता शाहू पुतळ्यापासून  मोटारसायकल रॅली काढण्यात आली झाली.  सुरू झालेल्या या रॅलीमध्ये युवकांचा सहभाग लक्षणीय प्रमाणात होता. सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास या भागातील अंबाबाई मंदिरात विधीवत पूजाआरती करण्यात आली. तेथून अंबामातेचा जयघोष करीत मिरवणूक निघाली. मिरवणुकीमध्ये पारंपरिक वेशातील नागरिकांचा उत्साही सहभाग होता. शाहू भागातील गुजरी पेठ, वेतळा चौक, टिळक पुतळा मार्गे मिरवणूक राजवाडय़ामध्ये आली. तेथील बिरदेव मंदिराचे दर्शन घेण्यात आले. नगरीच्या अधिपतींचे विद्यमान वारसदार श्रीमंत आबासाहेब घोरपडे यांना दसऱ्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या. त्यानंतर मिरवणूक गांधीपुतळ्याजवळ पोहोचली. तेथे कोहळा फोडण्याचा विधी पार पडला. त्यानंतर मिरवणूक दसरा महोत्सवाचे मुख्य ठिकाण असलेल्या घोरपडे नाटय़गृहाजवळ आली.
तेथे उभारण्यात आलेल्या व्यासपीठावर मान्यवरांची उपस्थिती होती. मालदिवचे उच्चायुक्त ज्ञानेश्वर मुळे यांनी दसऱ्याचे महत्त्व या विषयावर विचार मांडले, खासदार जयवंतराव आवळे, आमदार सुरेश हाळवणकर, सुरेश पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. या मान्यवरांच्या हस्ते गणराया पुरस्काराचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमास नगराध्यक्षा रत्नप्रभा भागवत, पोलीस उपअधीक्षक प्रकाश देशमुख, रणजित कदम, शशीकला बोरा आदी उपस्थित होते. सुरेश पाटील यांनी शमीच्या पानांचे पूजन केल्यानंतर सोने लुटण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली. मोहन माने यांनी स्वागत केले.