धुक्यात हरवलेले रांगण्याचे पदभ्रमण Print

इचलकरंजी गिरिभ्रमण संघटनेची मोहीम
कोल्हापूर / प्रतिनिधी

सायंकाळच्या सुमारास दाटलेले दाट धुके..एका बाजूला तटबंदी तर दुसऱ्या बाजूला खोल दरी..त्यातूनच वस्तीचे ठिकाण शोधताना हरवलेली वाट..अखेरीस चाचपडत वेध घेत शोधलेली जागा..हा थरार अनुभवताना सकाळच्या सुमारास हाकेच्या अंतरावर असलेले वस्तीचे ठिकाण म्हणजे रांगणाई देवीचे मंदिर पाहून मनाला मिळालेले समाधान असा थरारआणि उत्साहाचा दुहेरी अनुभव घेत इचलकरंजी गिरिभ्रमण संघटनेच्या सदस्यांनी भुदरगड तालुक्यातील रांगणा किल्ल्याची पदभ्रमंती मोहीम पार पाडली.
येथील निसर्ग, गिरिप्रेमी आणि ऐतिहासिक फोटो प्रदर्शन या क्षेत्रात कार्यरत असलेल्या इचलकरंजी गिरिभ्रमण संघटनेच्या सदस्यांनी भुदरगड तालुक्यातील रांगणा किल्ला पदभ्रमंतीची मोहीम आखली होती.  सर्व जण इचलकरंजीतून गारगोटी आणि तेथून दुपारच्या सुमारास भटवाडी येथे पोहोचले. तेथे वनभोजन आटोपून मोहिमेला प्रारंभ करण्यात आला.
केवळ पायवाटच असल्याने तब्बल तीन ते चार तासांची वाट तुडवत आणि जंगलातील पाने, फुले, वनौषधांची माहिती घेत टीम किल्ल्याच्या महादरवाजापर्यंत पोहोचली. किल्ल्यात प्रवेश करताच समोर ऐतिहासिक िनबाळकर वाडय़ाचे शिल्लक राहिलेले अवशेष दिसून आले. तोपर्यंत सूर्य मावळतीला पोहोचला होता. त्यातच धुक्याचे पांघरु ण पसरू लागले. एकमेकांचा आधार घेऊन वस्तीच्या ठिकाणाचा शोध सुरू झाला.
रांगणाई देवीच्या मंदिरात मुक्काम करावयाचा होता. पण दाट धुक्यामुळे समोरचेही काही दिसेनासे झाले. एका बाजूला किल्ल्याची तटबंदी तर दुसऱ्या बाजूला खोल दरी यामुळे अंदाजही करता येत नव्हता. अखेरीस चाचपडत आणि पाण्याच्या खळखळाटाचा अंदाज घेऊन सपाट जागा शोधून तंबू ठोकला आणि वस्ती केली.
पण सकाळी उठल्यानंतर सर्वाच्याच चेहऱ्यावर हास्य आणि रात्रीचा थरार कोठच्या कोठे पळून गेला. सर्वानी मग मंदिर व परिसराची साफसफाई केली आणि रांगणाई देवी व शंभू महादेवाचे दर्शन घेतले. त्यानंतर गडावरील कल्याण दरवाजा, कोकण दर्शन, समोरील मनसंतोषगड, अजस्त्र सह्याद्रीच्या रांगा डोळ्यात सामावून घेतानाच कॅमेराबंदही केल्या अन् सर्व जण थरार अनुभवाची आणखी एक शिदोरी घेऊन परतीच्या मार्गाला लागले.
या मोहिमेत संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र जाधव, उपाध्यक्ष महेश जाधव, अमर बुचडे, पंढरीनाथ फाटक, मधुकर गुरव, गजानन पारनाईक, नीलेश पाटील, हरिष बारवाडे, सुनील कोठावळे, आनंदा थोरवत, दत्तात्रय कडतारे, विनायक घोरपडे आदी सहभागी झाले होते.