दसऱ्याच्या मुहूर्तावर खरेदीचा उत्सव Print

कोल्हापूर / प्रतिनिधी
महागाईने कळस गाठला असला तरी कोल्हापूर शहरामध्ये खरेदीचा उत्सवही रंगात आला होता. जिल्ह्य़ातील अन्य बाजारपेठेमध्येही ग्राहकराजाने गर्दी केल्याचे चित्र कायम होते. साडेतीन मुहूर्तापैकी एक असणाऱ्या विजयादशमीला खरेदी करण्यासाठी वाहन दुकाने, इलेक्ट्रॉनिक वस्तू, गृहोपयोगी वस्तू इथे ग्राहकांची वर्दळ होती. सराफ पेठेतही सोन्या-चांदीच्या खरेदीसाठी दरवर्षीप्रमाणे गर्दीचे चित्र दिसतच होते. कोल्हापूर शहरात दिवसभरात १०० कोटीहून अधिक रुपयांची उलाढाल झाल्याचे वृत्त आहे.
विजयादशमीच्या मुहूर्तावर खरेदी करण्याची परंपरा आहे. या परंपरेला जपत ग्राहकराजाने आज खरेदीसाठी बाजारपेठेत धाव घेतली. श्रीमंत व उच्च मध्यमवर्गीय खरेदीत आघाडीवर होते. त्याचबरोबर मध्यमवर्गीय व सामान्य माणूस मुहूर्तावर खरेदी करायची असे ठरवून घरघुती वस्तू खरेदी करताना दिसत होता. दसरा महिनाअखेरीला आल्याने खाजगी नोकर व श्रमिक यांना आर्थिक झळ बसल्याने हा वर्ग खरेदीपासून काहीसा दूर होता.
दुचाकी, मोटार, टीव्ही, एलसीडी, कुकर, मायक्रोओव्हेन, फ्रिज, व्हाशिंग मशिन अशा कंपन्यांनी खरेदीवर लक्षणीय प्रमाणात सूट दिली आहे. या वस्तूंच्या किमती कमी झाल्याने त्याच्या खरेदीकडे ग्राहकांचा कल होता. दिवसभरात ५०० हून अधिक मोटारींचे बुकिंग झाल्याचे वृत्त आहे. सुमारे २५ कोटींची उलाढाल याच उद्योगात झाली असल्याचे समजते. त्याचबरोबर १ हजाराहून अधिक दुचाकी विकल्या गेल्या आहेत. यांचीही ५ कोटीहून अधिक उलाढाल झाल्याचे सांगण्यात येते.    
आधुनिक काळाला साजेशे ठरणारे असे आधुनिक टीव्ही खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी दुकान गाठले होते. त्याच्या जोडीला होमथिएटरचा खपही वाढला होता. १० हजार रुपयांपासून २ लाख रुपयांपर्यंत एलईडी विक्रीसाठी उपलब्ध होते. इलेक्ट्रॉनिक विक्रीच्या दुकानात दसऱ्याच्या मुहूर्तावर फ्रिज, व्हाशिंग मशिन, मायक्रोओव्हेन यांना मागणी होती. अद्यावत सुविधा व आधुनिक पध्दतीचा लूक असणाऱ्या साधनांची खरेदी करण्यास ग्राहक पसंती देत होता. त्याचबरोबर कुकर, मिक्सर, पंखे अशा वस्तूंची मागणी कायम होती. विशेष म्हणजे तांब्याच्या भांडय़ांची मागणी वाढू लागली आहे. त्यामुळे घागर, बंब अशा स्वरूपातील तांब्याची भांडी मोठय़ा संख्येने विकली गेली. सोने व चांदीच्या दरामध्ये गेल्या काही महिन्यात प्रचंड दरवाढ झाल्याने त्याचा काहीसा परिणाम सोन्या-चांदीच्या दुकानामध्ये दिसून आला. सोन्याने ३० हजारांचा टप्पा ओलांडला असला तरी आणि चांदीने ६०हजार रुपये किलोची मजल मारली असली तरी सोन्या-चांदीची आभूषणे खरेदी करताना ग्राहक दिसत होता.  सोन्या-चांदीच्या किमती वाढत असल्या तरी एक चांगल्या प्रकारची गुंतवणूक म्हणून त्याची खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल आहे, असे सराफांचे म्हणणे आहे. एकंदरीत लहानसहान वस्तूंपासून ते सोन्या-चांदीची महागडी खरेदी करण्याकडे ग्राहकराजाची ओढ होती. दसऱ्याची संधी साधत काहींनी दिवाळीसाठी लागणारे कपडे, तयार कपडे यांचीही खरेदी केल्याने अशाप्रकारच्या दुकानांतही ग्राहकांची वर्दळ होती.