करवीरचा शाही दसरा साजरा Print

सीमोल्लंघन, पालखी मिरवणूक आणि सोने लुटण्यासाठी गर्दी
कोल्हापूर / प्रतिनिधी ,गुरुवार, २५ ऑक्टोबर २०१२
शमीपूजनाचा सोहळा झाल्यानंतर ऐतिहासिक दसरा चौकात श्रीमंत शाहूमहाराज, युवराज मालोजीराजे, युवराज संभाजीराजे यांना सोने व शुभेच्छा देण्यासाठी करवीरकरांची गर्दी झाली होती. (छाया- राज मकानदार)

करवीरनगरीतील ऐतिहासिक शारदीय नवरात्रोत्सव सोहळय़ाची सांगता शाही सीमोल्लंघनाने व पालखी मिरवणुकीने झाली. छत्रपती घराण्यातील मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळय़ावेळी परंपरेनुसार सोने लुटण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती.
साडेतीन शक्तिपीठापैकी एक महत्त्वपूर्ण पीठ म्हणून श्री महालक्ष्मी मंदिराचा उल्लेख केला जातो. गेले ९ दिवस येथे विविध प्रकारचे धार्मिक विधी उत्साहात व मंगलमय वातावरणात पार पडले.
दररोज लाखांहून अधिक भाविकांची गर्दी मंदिरात होत होती. आज विजयादशमीच्या मुहूर्तावर दर्शन घेण्यासाठी भक्तगण लोटले होते. तिरुपती बालाजी येथून पाठविण्यात आलेला मानाचा शालू देवीला परिधान करण्यात आला होता. दसऱ्याचे सोने लुटण्यासाठी महालक्ष्मीची पालखी लव्याजम्यासह बाहेर पडली. तोफेची सलामी दिल्यानंतर पालखी भवानी मंडपात आली. तेथे महालक्ष्मी, तुळजाभवानी व गुरू महाराज पालखीची भेट झाली. पारंपरिक वाद्ये, चोपदार, करवीर संस्थानचा पोलीस बँड, बंदूकधारी हवालदार, त्यांचा लवाजमा वाजत-गाजत दसरा चौकाकडे निघाला. या मार्गावर पालखीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी होत होती.
दसरा चौकात पारंपरिक पद्धतीने सीमोल्लंघनाचा सोहळा पार पडला. दसऱ्याचे सोने लुटण्यासाठी छत्रपती शाहूमहाराज, युवराज संभाजीराजे, छत्रपती मालोजीराजे यांच्यासह शाही परिवार दाखल झाला होता. प्रतिवर्षीप्रमाणे मेबॅक या ७५ वर्षे पूर्ण झालेल्या मोटारीतून शाही परिवार आला. या सोहळय़ाच्या वेळी येणारी मेबॅक ही गाडी नागरिकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असते. जिल्हाधिकारी राजाराम माने, जिल्हा पोलीसप्रमुख विजयसिंह जाधव, देवस्थान समितीचे सदस्य, शहरातील मान्यवर यांच्या   उपस्थितीत  हा सोहळा पार पडला.    
शमीच्या पानांच्या पूजनासाठी दसरा चौकात मध्य ठिकाणी चौक करण्यात आला होता. दसरा चौकामध्ये विजयादशमीच्या सोहळय़ामध्ये विशेष सजावट व विद्युतरोषणाई करण्यात आली होती. भव्य शामियाना उभारण्यात आला होता. सोने लुटण्याचा कार्यक्रम पार पडल्यानंतर महालक्ष्मी, तुळजाभवानी व गुरू महाराजांची पालख्या परतीच्या मार्गाने निघाल्या. त्यांच्या प्रवास वेगवेगळय़ा मार्गाने होता. महालक्ष्मीची पालखी मंदिरात आल्यानंतर तोफेची सलामी देऊन आरती झाल्यावर पालखी गरुड मंडपात स्थानापन्न झाली.
श्रीमंत शाहूमहाराज यांनी विधिवत शमीच्या पानांचे पूजन केले. त्यानंतर सोने लुटण्यासाठी त्या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती. तर श्रीमंत शाहूमहाराज यांना दसऱ्याच्या शुभेच्छा देण्यासाठी   नागरिक  त्यांच्याकडे धाव घेत होते.
दरम्यान, दसरा चौकाला आज जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. छोटय़ा व्यावसायिकांनी खेळण्यांचे स्टॉल मोठय़ा संख्यने उभारले होते. तेथे बालचमूंची गर्दी झाली होती. तर महालक्ष्मीची पालखी निघालेल्या मार्गावर भव्य स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या. त्यामुळे कोल्हापूरचे आजचे चित्र उत्साहवर्धक होते.