सोलापूर महापालिकेत लवकरच ई-गव्हर्नन्स सेवा Print

सोलापूर /प्रतिनिधी
सोलापूर महानगरपालिकेचा कारभार पारदर्शक स्वरूपाचा चालण्यासाठी ई-गव्हर्नन्स सेवा सुरू करण्याचा प्रयत्न गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असताना लवकरच त्यास मूर्त स्वरूप प्राप्त होणार असल्याचे पालिका सूत्रांनी सांगितले. पालिकेच्या मंडल अधिकाऱ्यांच्या बैठकीत ई-गव्हर्नन्स सेवा एका महिन्यात सुरू करण्याबाबत शिक्कामोर्तब करण्यात आले. या सेवेंतर्गत निविदा भरण्याची प्रक्रिया राबविली जाणार असल्याने पालिकेच्या कारभार पारदर्शक राहण्यास मदत होणार आहे. याशिवाय जन्म-मृत्यू दाखला, कर भरणा प्रमाणपत्र व अन्य सुविधा नागरिकांना विनाविलंब मिळणार आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून पालिकेत ई-गव्हर्नन्स सेवाप्रणाली सुरू करण्याबाबत केवळ चर्चेचे गुऱ्हाळ सुरू होते. परंतु त्यास कधीही मूर्त स्वरूप आले नाही. आता पालिका प्रशासनाने याबाबत ठोस पावले उचलून ई-गव्हर्नन्स सेवा सुरू करण्याचे ठरविल्याचे सांगण्यात आले.