कालिकादेवी पतसंस्था सभासदांना सोन्याचे नाणे भेट Print

कराड/वार्ताहर
रौप्यमहोत्सवानिमित्त येथील श्री कालिकादेवी नागरी सहकारी पतसंस्था सभासदांना १ ग्रॅम सुवर्ण नाण्याची भेट देणार असून, सभासदांचा १ लाख रुपयांचा अपघाती विमाही उतरवला असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रा. अशोक चव्हाण यांनी पत्रकार बैठकीत दिली. संस्थेचे संस्थापक मुनीर बागवान (सावकार) यांच्यासह संचालक मंडळाची उपस्थिती होती. अशोक चव्हाण म्हणाले की, सामान्य सभासद, ठेवीदार हितचिंतक व खातेदारांनी दाखवलेल्या विश्वासामुळे संस्थेने आजपर्यंतची प्रगती केली आहे. संस्थेकडे ३८ कोटी ६३ लाख रुपयांच्या ठेवी असून, एकूण सभासद १,९६०, कर्ज ३० कोटी, राखीव निधी १ कोटी ८८ लाख, गुंतवणूक ९ कोटी ५९ लाख, खेळते भांडवल ४५ कोटी ९१ लाख आहे. संस्थेने १५ टक्के लाभांश दिला आहे. ऑडिट वर्ग ‘अ’ असून, संस्थेतर्फे इंटरनेट बँकिंगद्वारे ई-पेमेंट, व्हॅट टॅक्सेस, आरटीजीस/एनईएफटी जागतिक पातळीवर स्टेट बँक ऑफ इंडिया माध्यमातून मल्टी सिटी चेक, डीडीची सुविधा सुरू करून पश्चिम महाराष्ट्रात नेट बँकिंग सुविधा देणाऱ्या पहिल्या संस्थेचा मान मिळवला आहे.