‘अंगणवाडय़ांतील बालकोंना आहार पासून वंचित ठेवू नका’ Print

सातारा जि.प.अध्यक्षांचे आवाहन
वाई/वार्ताहर
एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत अंगणवाडीस्तरावर ३ वर्ष ते ६ वर्षे वयोगटातील मुलांना स्थानिक  बचतगटांमार्फत शासनमान्य दरानुसार दररोज आहारपुरवठा होत असून, सध्या महागाईमुळे आहार वाटप करण्यास परवडत नाही म्हणून २५ ऑक्टोबरपासून आहार वाटप बंद ठेवण्यात येणार अशा वृत्ताच्या अनुषंगाने अंगणवाडी कार्यकर्तीनी बालकांना आहारापासून वंचित ठेवू नये असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष अरुणादेवी पिसाळ आणि महिला व बालविकास सभापती नीलम पाटील पार्लेकर यांनी केले आहे.
अंगणवाडी कार्यकर्तीना त्यांनी आवाहन केले आहे, की अंगणवाडीत येणारी मुले ही तुमच्याच गावची असून त्यांना आहारापासून वंचित ठेवणे योग्य नाही. त्यामुळे कुपोषणात वाढ होईल. अंगणवाडीस्तरावर वाटप करण्यात येणारा आहार हा स्थानिक बचतगटांमार्फत वाटप करण्यात येतो. महागाईमुळे शासनमान्य दरात आहारपुरवठा करण्यात अडचणी आहेत याची जाणीव शासनस्तरावर आहे. आहार वाटपाचा दर वाढवून द्यावा यासाठी महिला बालविकास समितीने ठराव करून शासनास सादर केला आहे, तरी अंगणवाडीसेविकांनी लाभार्थीना आहारापासून वंचित ठेवू नये असे आवाहन पिसाळ आणि पाटील यांनी केले आहे.