‘ग्रामसडक योजनेतून गावजोड रस्त्यांच्या मजबुतीकरणाचा कार्यक्रम लवकरच’ Print

कृष्णा पूल उद्घाटनावर राष्ट्रवादीचा बहिष्कार
 कराड/वार्ताहर
दळणवळणाच्या सुविधांना प्राधान्य देण्याची राज्य शासनाची भूमिका असून ग्रामीण भागातील गावजोड रस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी केंद्र सरकारकडे निधीची मागणी केली गेली आहे. आता पूल व रस्त्यांसाठी केंद्राकडून भरीव निधी येईल. पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून मोठय़ा प्रमाणातून कामे हाती घेतली जातील, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत गुहागर ते विजापूर या राज्यमार्ग क्रमांक ७८ वरील कराडच्या कृष्णा नदीवरील उंच पुलाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. राज्याचे वनमंत्री डॉ. पतंगराव कदम, सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, गृह राज्यमंत्री सतेज पाटील, आमदार जयकुमार गोरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता ई. पी. उगिले, अधीक्षक अभियंता आर. आर. केडगे. यांची उपस्थिती होती.  
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, कृष्णा नदीवरील या उंच पुलाची मागणी आज पूर्ण होत आहे. हा अतिशय महत्त्वाचा पूल सातारा, सांगली जिल्ह्याला जोडणारा आहे. आता या पुलामुळे पावसाळय़ात वाहतूक बंद राहणार नाही. कराड ते ओगलेवाडी या रस्त्याच्या चौपदरीकरणाचा प्रस्ताव आला असून, त्याचा विचार केला जाईल. सैदापूरच्या विविध विकास कामांना योग्य न्याय दिला जाईल.
डॉ. पतंगराव कदम म्हणाले की, कृष्णा नदीवरील या उंच पुलामुळे कराड आणि कडेगाव तालुक्यातील वाहतूक कायमस्वरूपी राहणार असल्याने लोकांची मोठी सोय झाली आहे. हा राजकीय कार्यक्रम नसून, शासकीय कार्यक्रम असल्याचे सांगताना बारीक-सारीक गोष्टी काढून नुकसान करून घेऊ नका असा सल्ला त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व कार्यकर्त्यांना दिला. हर्षवर्धन पाटील, आनंदराव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक आर. आर. केडगे यांनी केले.  
राष्ट्रवादीचा बहिष्कार!
मुख्यमंत्र्यांच्या कराडमध्ये आयोजित या शासकीय कार्यक्रमाला निमंत्रणपत्रिकेवरील १४ पैकी राष्ट्रवादीच्या लोकप्रतिनिधींसह ९ मान्यवरांनी अनुपस्थिती दर्शवत जणू बहिष्कारच टाकल्याचे चित्र उद्घाटन कार्यक्रमापेक्षाही जोरदार चर्चेत होते.
एनकेन कारणाने कार्यक्रमाचे अध्यक्ष सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ इच्छा असूनही उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र, त्यांनी आपल्या शुभेच्छा कळविल्याचा निर्वाळा हर्षवर्धन पाटील यांनी पुलाच्या उद्घाटन कार्यक्रमात दिला. तर सदर कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी घेण्यात आलेल्या पत्रकार बैठकीला या पुलासाठी पाठपुरावा करणारे आणि लोकप्रतिनिधी असलेले राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील व माजी खासदार श्रीनिवास पाटील यांना जाणीवपूर्वक वगळण्यात आल्याने उद्घाटनाच्या आदल्या दिवशीच म्हणजे परवा मंगळवारी राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी पुलाचे उद्घाटन करून आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.
आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते पार पडलेल्या कृष्णा पुलाच्या उद्घाटन कार्यक्रमाला काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार विलासकाका पाटील हेही अनुपस्थित होते. तर गृहमंत्री आर. आर. पाटील, ग्रामविकासमंत्री जयंत पाटील, खासदार उदयनराजे भोसले, माजी खासदार
 श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, प्रभाकर घार्गे या निमंत्रणपत्रिकेवरील राष्ट्रवादीच्या लोकप्रतिनिधींसह कार्यकर्त्यांनी मानापमान आणि मनमानीच्या तक्रारीस्तव मुख्यमंत्र्यांच्याच कार्यक्रमापुढे  सपशेल पाठ फिरवून कमाल केली.