वाई नगराध्यक्षांच्या सह्य़ांचे नमुने हस्ताक्षर तज्ज्ञांकडे पाठविण्याचे आदेश Print

खरात दाम्पत्याचे पक्षांतर
 वाई/वार्ताहर
वाई तीर्थक्षेत्र विकास आघाडी ही नगरपालिका निवडणुकीनंतर नोंदविण्यात आली असून या वेळी वाईच्या नगराध्यक्षांनी व त्याच्या पतीने कोठेही सह्य़ा केल्या नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना कळविले होते. त्यामुळे त्यांच्या सह्य़ांचे नमुने हस्ताक्षर तज्ज्ञांकडे तपासणीसाठी पाठविण्याचा आदेश साताऱ्याचे जिल्हाधिकारी रामास्वामी यांनी दिला.
नगराध्यक्षा निलीमा खरात व त्यांचे पती दत्तात्रय खरात यांनी तीर्थक्षेत्र विकास आघाडीशी मतभेद झाल्याने विरोधी आघाडी जनकल्याण आघाडीत प्रवेश केला होता. त्यामुळे खरात दाम्पत्यांवर पक्षांतर बंदी कायद्याखाली कारवाई करावी व त्यांचे सदस्यत्व रद्द करावे यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे दावा दाखल केला आहे. त्याची सुनावणी सद्या त्यांच्या समोर सुरू आहे.
खरात यांचे वकील अ‍ॅड. मुकुंद सारडा यांनी मांडलेली बाजू लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी तीर्थक्षेत्र आघाडी नोंदणी वेळी केलेल्या सह्य़ांची हस्ताक्षर तज्ज्ञांकडून तपसणी करून घेण्याचा आदेश दिला. या तज्ज्ञांचा अहवाल आल्यानंतरच पुढील सुनावणी होईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे हस्ताक्षर तज्ज्ञांच्या अहवालावर या दाव्याचे भवितव्य ठरणार आहे.