कोल्हापुरात शेतकरी संघर्ष समितीचा मोर्चा Print

कोल्हापूर/प्रतिनिधी

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना गत हंगामासाठी अंतिम दर २५०० रुपये मिळावा, चालू हंगामासाठी प्रतिटन ३५०० रुपये द्यावेत, त्यातील पहिला हप्ता २८८० रुपये द्यावा या मागणीसाठी गुरुवारी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी राजाराम माने यांच्याशी आंदोलकांनी या प्रश्नी चर्चा केली.
डावे पक्ष व जनता दल यांच्या वतीने चार दिवसांपूर्वी केशवराव भोसले नाटय़गृहात राज्यस्तरीय शेतकरी परिषद पार पडली होती. त्यामध्ये मंजूर करण्यात आलेल्या ठरावांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आजच्या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. दसरा चौक येथून सुरू झालेला मोर्चा महानगरपालिका, शिवाजी चौक, फोर्ड कॉर्नर मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. तेथे शेतकऱ्यांनी जोरदार निदर्शने केली.
जिल्हाधिकारी राजाराम माने यांच्यासह साखर उपसंचालकांशी मोर्चाच्या शिष्टमंडळाने चर्चा केली.
प्रा. एन. डी. पाटील, अ‍ॅड. गोिवद पानसरे, माजी आमदार संपतराव पवार, नामदेव गावडे, प्रा. सुभाष जाधव, अरुण सोनाळकर, बाबासाहेब देवकर, प्रा. ए. बी. पाटील, केरबा पाटील, अप्पा परीट, दिनकर सूर्यवंशी यांनी शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या.