ऊस दर आंदोलन पेटले Print

उसाला पहिला हप्ता ४ हजाराचा द्या, अन्यथा कारखाने सुरू होऊ देणार नाही
शेतकरी संघटनेचा इशारा
कराड/वार्ताहर, शुक्रवार, २६ ऑक्टोबर २०१२

उसाला पहिला हप्ता ४ हजार रुपये मिळालाच पाहिजे, साखरेवरील लेव्ही व मोलायसेसवरील राज्यबंदी उठवली जावी अशी मागणी आपण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली आहे. आमच्या मागण्यांना मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी दिली. मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर ते येथे पत्रकारांशी बोलत होते. संघटनेचे नेते शंकरराव गोडसे उपस्थित होते.  
रघुनाथ पाटील म्हणाले, चालू गळीत हंगामात उसाला ४ हजार रुपये पहिला हप्ता मिळालाच पाहिजे ही आमची न्याय्य व मुख्य मागणी आहे. आमच्या या मागणीप्रमाणे उसाला दर मिळाला नाही तर साखर कारखाने सुरू होऊ देणार नसल्याचा इशारा आपण दिला आहे. सी. रंगराजन कमिटीने दिलेल्या अहवालाची अंमलबजावणी का केली जात नाही, असा सवाल त्यांनी केला. साखरेवरील लेव्ही उठवल्यास टनामागे २४० रुपयांचा जादा ऊसदर उत्पादक शेतकऱ्याला मिळणार आहे. साखरेवरील निर्यातबंदी, लेव्ही उठवताना मोलायसेसवरील राज्यबंदीही उठवल्यास आमच्या मागणीप्रमाणे उसाला दर मिळण्यास हरकत नसल्याचा दावा त्यांनी केला. या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली असून, त्यांनी आमचे म्हणणे गांभीर्याने घेत सहकार्याची भूमिका व्यक्त केली असल्याचे रघुनाथ पाटील यांनी सांगितले.