संक्षिप्त Print

पालिका पदाधिकाऱ्यांच्या अधिवेशनाला मुख्यमंत्री निमंत्रित
कराड/वार्ताहर - यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीनिमित्त कराड पालिकेतर्फे आयोजित पुणे विभागातील नगरपालिका व नगरपंचातींच्या पदाधिकारी सदस्यांच्या दोन दिवसीय अधिवेशनास प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना निमंत्रित करण्यात आले आहे. दरवर्षांप्रमाणे दसऱ्यानिमित्त कर्मभूमी कराडच्या दौऱ्यावर आलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांची नगराध्यक्षा प्रा. उमा हिंगमिरे व उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव यांच्यासह पालिकेतील सर्व सदस्यांनी भेट घेतली. पंचायतराज संकल्पनेचे जनक यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीवर्षांनिमित्त येत्या २४ व २५ नोव्हेंबर या दोन दिवसात पुणे विभागातील पालिका व नगरपंचायतींच्या पदाधिकारी, सदस्यांचे अधिवेशन होत असल्याबाबत चर्चा करून सदर अधिवेशनास मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहण्याचे मुख्यमंत्र्यांना निमंत्रण देण्यात आले. यशवंतराव चव्हाण स्मृतिसदनाचे नूतनीकरण कामाचे अनुदान, इतर विकास कामासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात आली.  
पंचगंगा बँकेचे माजी अध्यक्ष शरदचंद्र अष्टेकर यांचे निधन
कोल्हापूर/प्रतिनिधी -पंचगंगा नागरी सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक शरदचंद्र रामचंद्र अष्टेकर (वय ६२) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. अष्टेकर १९८१ पासून सलग ३२ वर्षे संचालक म्हणून कार्यरत होते. या कालावधीत त्यांनी ८ वेळा अध्यक्षपदाची व एकवेळा उपाध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडली. सध्या त्यांच्याकडे बँकेच्या ग्राहक संपर्क संचालकपदाची जबाबदारी होती. १९८१ साली केवळ ४५ लाख असणारा व्यवसाय आज २४० कोटींपेक्षा अधिक झाला आहे. पंचगंगा बँकेच्या वाटचालीत शरदचंद्र अष्टेकर यांचे योगदान मोठे आहे.
सहकार भारती पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष व करवीर नगर वाचन मंदिर उपाध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुली, सुना, नातवंडे, जावई असा परिवार आहे.
विमल मुथा यांचे निधन
सोलापूर /प्रतिनिधी- शहरातील चमक व टॉवेलचे व्यापारी चंपालाल पुखराज मुथा यांचे चिरंजीव विमल मुथा (वय ३५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, पुत्र, कन्या, बंधू असा परिवार आहे. विमल मुथा हे पुण्यातील निवासस्थानी वास्तव्यास असताना त्यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले.