शाहू कारखान्यातर्फे मागील गळितास दीडशे रु पये तिसरा हप्ता Print

कोल्हापूर/प्रतिनिधी
कागल येथील श्रीमंत छत्रपती शाहू साखर कारखान्याच्या २०११-१२ मधील  उसास प्रतिटन १५० रु पयाचा तिसरा हप्ता जाहीर झाला. तिसऱ्या हप्त्य़ाची ९ कोटी ९५ लाख १३ हजार इतकी रक्कम ऊस उत्पादकांच्या बँक खात्यावर दिवाळीपूर्वी जमा केली जाईल अशी  माहिती, कारखान्याचे उपाध्यक्ष एस. के.मगदूम यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी ज्येष्ठ संचालक आ. वीरकुमार पाटील, कार्यकारी संचालक विजय औताडे उपस्थित होते.
मगदूम म्हणाले, तिसऱ्या हप्तय़ाची रक्कम उशिरा गळीत अनुदानासह प्रतिटन रक्कम २,४२० ते २,४०० इतकी रक्कम अँडव्हान्सच्या स्वरूपात मिळणार आहे. यापूर्वी प्रतिटन  २,१५० देण्यात आले आहेत. हंगाम २०११-१२ मध्ये गळीत केलेल्या ६ लाख ६३ हजार ४१५ मे. टनावर लवकर परिपक्व ऊसजाती अनुदान तसेच उशिरा गळीत अनुदान व तिसऱ्या हप्तय़ाची अशी एकूण रक्कम  १५६ कोटी १३ लाख उत्पादकांना मिळणार आहे.  ते म्हणाले, गत हंगामात ६ लाख ६३ हजार ४१५ मे.टन उसाचे गाळप होऊन १२.८३ टे साखर उताऱ्याने ८ लाख ५१ हजार साखर पोत्यांचे उत्पादन झाले.
तसेच २०१२-१३ च्या हंगामात आधुनिकीकरण व विस्तारवाढीची कामे पूर्ण झाली आहेत. हंगामाचा प्रारंभ २९ ऑक्टोबरला संस्थापक अध्यक्ष विक्रमसिंह घाटगे यांच्या हस्ते होणार आहे.
कारखाना प्रतिदिनी ५००० मे.टन गाळप क्षमतेने चालणार आहे. सभासद, ऊस उत्पादकांनी यापूर्वी विक्रमसिंह घाटगे यांनी आवाहन केल्यानुसार हंगाम २०१२-१३ साठी ऊस कारखान्यास पाठवावा, अशी विनंती मगदूम यांनी केली.