जैन श्वेतांबर समाजातर्फे उपधान तप सोहळय़ास प्रारंभ Print

सोलापूर /प्रतिनिधी
जैनमुनींच्या दिनचर्येच्या धर्तीवर सोलापुरात श्री आदिश्वर जैन श्वेतांबर मूर्तिपूजक संघाच्या वतीने आयोजित उपधान तप सोहळय़ात ८५ भक्तांनी सहभाग नोंदवून तपस्या केली. यात सर्व सुखसुविधांचा त्याग एक दिवस उपवास, दुसऱ्या दिवशी नीवि म्हणजे एकदाच तेसुद्धा मर्यादित भोजन केले जाते.
सम्राट चौकातील गोविंदजी रावजी आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या प्रांगणात-उपधान नगरात ४७ दिवसांपर्यंत हा उपधान तप सोहळा चालणार आहे. जैनमुनी सुरिरामचंद्र साम्राज्यवर्ती यांचे शिष्य मोक्षरक्षित विजयजी, प्रभुरक्षित विजयजी, साध्वी मुक्तिरत्नाश्री यांच्या सान्निध्यात आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे यजमानपद तिलोकचंद रमेशकुमार ओसवाल परिवाराने स्वीकारले आहे. वीज, पंखा, वातानुकूलित उपकरणे, गादी अशा विविध भौतिक सुखसुविधांचा संपूर्ण त्याग करून १८ दिवसांपासून ते ४७ दिवसांपर्यंत हा उपधान तप केला जातो. यात जैनमुनी साधू-साध्वींसारखे खडतर जीवन जगण्याची साधना म्हणून या तपाकडे पाहिले जाते.
या उपधान तप सोहळय़ात आठ वर्षांच्या मोक्षित बाफना याच्यासह ७० ते ७५ वर्षांपर्यंतच्या वयोवृद्ध स्त्री-पुरुषांपर्यंत साधक सहभागी झाले आहेत. नीविच्या दिवशी शंभर खमासणे म्हणजे उभे राहून शास्त्रशुद्धपणे खाली बसल्यानंतर माथा जमिनीवर टेकवून परमेश्वराला नमस्कार करण्याचा शास्त्रोक्त विधी होय. शंभर लोगस्स सूत्राचे पाठ प्राकृत भाषेत होते. यात २४ र्तीथकरांचे नामस्मरण तथा प्रार्थना करायची असते. इतर धार्मिक विधी पूर्ण केला जातो. दुपारी उशिरा गुरू आज्ञा झाल्यानंतर तीन उकळी फुटलेले पाणी थंड करून प्यायचे असते. अशी ही विशिष्ट समूह साधना या तपाद्वारे केली जाते.
सोलापूर जैन संघात सात वर्षांपूर्वी अशा प्रकारचा विधी ३८ साधकाच्या सहभागातून संपन्न झाला होता. यंदाचा हा उपधान तप सोहळा सोलापुरात तिसऱ्यांदा होत आहे. यजमान ओसवाल परिवारातील रमेशकुमार, रश्मीबेन व लताबेन यांनीही या सोहळय़ात सहभाग नोंदविला.