‘यशवंतरावांचा आदर्श ठेवून कारभार झाला असता तर घोटाळे झाले नसते’ Print

सोलापूर /प्रतिनिधी
यशवंतराव चव्हाण यांनी सेवेचे साधन मानून सत्तेचा योग्य वापर करून महाराष्ट्राचा कृषी, उद्योग, शिक्षण, सहकार, जलसिंचन, साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रात विकास घडवून आणला. ते खऱ्या अर्थाने द्रष्टे, अभ्यासू, सभ्य, सुसंस्कृत व निष्कलंक चारित्र्यसंपन्न होते. त्याचा वारसा चालवायचा असेल तर महाराष्ट्रातील नेत्यांनी त्यांचा निष्कलंक चारित्र्याचा आदर्श समोर ठेवून कार्य केले पाहिजे. असा आदर्श ठेवून कारभार चालला असता तर राज्यात पुढाऱ्यांची एवढी भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीला आली नसती, असे परखड मत प्रा. डॉ. श्रीकांत येळेगावकर यांनी व्यक्त केले.
यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्त शहरातील पाणीवेस तालीम तरुण मंडळाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात डॉ. येळेगावकर यांचे ‘द्रष्टे नेते यशवंतराव चव्हाण’ या विषयावर व्याख्यान झाले. स्वातंत्र्यसैनिक नामदेवराव शिंदे हे अध्यक्षस्थानी होते. या वेळी व्यासपीठावर रामकृष्ण वानकर, माजी नगरसेवक विठ्ठल ननवरे, सोलापूर जिल्हा सामाजिक कार्य समितीचे अध्यक्ष उल्हास पाटील, अ‍ॅड. दत्ता घाडगे उपस्थित होते. यावेळी पूजा घाडगे व गौरी कदम या विद्यार्थ्यांनी तसेच परमेश्वर भिंगे यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या महाराष्ट्र व देशाच्या विकासासाठीच्या योगदानाबद्दल मनोगत मांडले. विठ्ठल ननवरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. श्रीनिवास कुमठेकर यांनी सूत्रसंचालन केले.