कारखान्यांच्या गळीत हंगाम कार्यक्रमासाठी सुशीलकुमार सोलापूर दौऱ्यावर Print

तीन साखर कारखान्यांचे कार्यक्रम
 सोलापूर /प्रतिनिधी
केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे येत्या २८ व २९ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हय़ाच्या भेटीवर येत असून, या भेटीत जिल्हय़ातील काँग्रेसच्या ताब्यातील तीन साखर कारखान्यांचा गळीत हंगामाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते होत आहे. त्यांच्यासोबत दि. २८ रोजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हेदेखील सोलापुरात येणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र त्यांचा अधिकृत दौरा अद्याप जिल्हा प्रशासनाकडे आला नाही.
सुशीलकुमार शिंदे हे दि. २८ रोजी सकाळी ६.५५ वाजता मुंबईहून सिद्धेश्वर एक्स्प्रेसने सोलापुरात येणार आहेत. सकाळी १० वाजता अक्कलकोट तालुक्यातील रुद्देवाडी येथे काँग्रेसचे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी खासगी तत्त्वावर उभारलेल्या मातोश्री लक्ष्मीबाई म्हेत्रे साखर कारखान्याचा चाचणी हंगाम तथा १६ मेगावॉट वीजनिर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. दुपारी तीन वाजता उत्तर सोलापूर तालुक्यातील तिऱ्हे येथे काँग्रेसचे आमदार दिलीप माने यांचा खासगी तत्त्वावरील सिद्धनाथ साखर कारखाना तसेच दुपारी चार वाजता पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथे सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या कार्यक्रमास उपस्थित राहून शिंदे हे रात्री सोलापुरात मुक्काम करणार आहेत.
२९ रोजी सकाळी दहा वाजता मंगळवेढा येथे संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या प्रांगणात काँग्रेसचे दिवंगत नेते किसनलाल मर्दा ऊर्फ मारवाडी वकील यांच्या पुतळय़ाचे अनावरण शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर दुपारी बारा वाजता पंढरपुरात एका समारंभात ह.भ.प. तुकाराम काळे महाराजांचा शिंदे यांच्या हस्ते सत्कार केला जाणार आहे. रात्री १०.४५ वाजता सोलापुरातून सिद्धेश्वर एक्स्प्रेसने ते मुंबईकडे रवाना होणार आहेत.
सुशीलकुमार शिंदे यांच्यासोबत दि. २८ रोजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हेदेखील एक दिवसाच्या सोलापूर भेटीवर येणार असल्याचे सांगण्यात आले. त्यांचा अधिकृत दौरा अद्याप प्राप्त झाला नसला तरी हा दौरा गृहीत धरून जिल्हा प्रशासनाने या दौऱ्याची तयारी ठेवली आहे.