‘लेक वाचवा’ प्रबोधनकाराच्या नशिबीसुद्धा आक्रोश Print

कराड/वार्ताहर
‘लेक वाचवा’ चा नारा देत प्रबोधनाचे कार्य करणारे विंग (ता. कराड) येथील ग्रामपंचायत सदस्य भागवत कणसे यांना लेकीच्या अपघाती मृत्यूच्या विरहाला सामोरे जावे लागले. अनुष्का भागवत कणसे (२) हिचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू झाला. कन्यारत्नाच्या महतीचा जागर करणारे कणसे यांचेच कन्यारत्न ऐन दुगरेत्सवात काळाने हिरावून नेल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
भागवत कणसे कराडनजीकच्या कोयना वसाहत येथे सध्या राहतात. मात्र, नवरात्र व दसऱ्याचा सण साजरा करण्यासाठी ते मूळगावी विंग येथे आले. गावात दुमजली घराचे प्लंबिंग व कलर काम सुरू असल्याने घरासमोरील पाण्याची टाकी उघडी होती.  खेळता खेळता अनुष्का टाकीत पडली. आणि काही क्षणात काळाने तिला हिरावून नेले. पेंटरना चहा देण्यासाठी वडील भागवत कणसे नवीन घरात गेले होते. त्यांची पुतणी वर्षां हिने त्यांना विचारले, अनुष्का तुमच्या पाठीमागून आली आहे ना? मग सर्वत्र शोध घेतला. मात्र, ती सापडली नाही. दहा मिनिटानंतर वडिलांनी पाण्याच्या टाकीकडे धाव घेतली. मात्र, दुर्दैव असे की पाण्यावर तरंगणारी अनुष्का पाहण्याचा दैवदुर्विलास त्यांच्या नशिबी आला.