बिद्री, आजरा कारखान्यांनी तोटा कमी केला- हसन मुश्रीफ Print

कोल्हापूर / प्रतिनिधी
आमच्या नेतृत्वाखाली बिद्री आणि आजरा कारखान्यांनी संचित तोटा कमी केला, तर भोगावतीमध्ये अद्याप फक्त १७ कोटी शिल्लक आहेत. ही प्रगतीची लक्षणे असून बिद्रीने हाती घेतलेल्या सहवीज प्रकल्पातून मिळणाऱ्या उत्पन्नातून प्रकल्पासाठी घेतलेले कर्ज भागवत ऊसउत्पादकांना अधिकाधिक दर देण्यासाठी व्यवस्थापनाने सतर्क राहावे, असे आवाहन कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
बिद्री, ता. कागल येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या ५० वा ऊस गळीत हंगाम शुभारंभप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शनपर भाषणात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष आमदार के. पी. पाटील होते.
अध्यक्ष आमदार के. पी. पाटील म्हणाले, प्रकल्प उभारताना काही अडचणी आल्याने केवळ चार लाख एकवीस हजार मे. टनांचे गाळप करून हंगाम बंद करावा लागला. या वर्षी त्या अडचणी दूर केल्या असून एका मिलवर प्रतिदिनी पाच हजार मेट्रिक टन उसाचे गाळप करणार आहे. सहवीज प्रकल्पामध्ये तयार झालेली वीज शंभर टक्के विकली जाणार आहे. त्यातून निश्चितच सभासदांना आर्थिक फायदा होणार आहे. सन २०१२-१३च्या गळितास येणाऱ्या उसाला अन्य साखर कारखान्यांपेक्षाही पुढे जाऊन पहिली उचल देण्यास कारखाना कमी पडणार नाही.
कार्यक्रमास कोल्हापूर बाजार समितीचे माजी सभापती दिनकर कोतेकर, भुदरगडचे सभापती बाबा नांदेकर, माजी संचालक महिपतराव िशदे उपस्थित होते. कार्यकारी संचालक आर. डी. देसाई यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष ए. वाय.पाटील यांनी आभार मानले.