इचलकरंजीतील २० स्वच्छतागृहे एका रात्रीत पाडली Print

आरोग्याधिकाऱ्यांना नागरिकांचा घेराव
 कोल्हापूर / प्रतिनिधी
इचलकरंजी येथील मंगळवार पेठ भागातील २० स्वच्छतागृहे रातोरात पाडण्याचा प्रकार घडल्याने या परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी नगरपालिकेच्या आरोग्याधिकाऱ्यांना घेराव घालून जाब विचारला. त्यांनी फिरते स्वच्छतागृह बांधून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर हा वाद संपुष्टात आला. तथापि शौचालये का पाडण्यात आली याचे उत्तर मात्र मिळू शकले नाही.
प्रभाग क्र.६ मध्ये ४२ सीटचे शौचालय बांधण्यात आले होते. या जागेवर नगरपालिकेने ‘पैसे द्या वापरा’ तत्त्वावर नवे शौचालय बांधण्याचे ठरविले आहे. पण बांधकामाच्या काळामध्ये नागरिकांसाठी पर्यायी व्यवस्था मात्र करण्यात आलेली नाही. या पाश्र्वभूमीवर ४२ पैकी ३६ सीटचे शौचालय पूर्वकल्पना न देता रातोरात जमीनदोस्त करण्यात आले आहे. मात्र याचवेळी बाजूला असलेल्या महिलांसाठी ८ शौचालयांना धक्का लावलेला नाही. त्यापैकी दोन शौचालये नादुरुस्त आहेत.
शुक्रवारी सकाळी नागरिक शौचालयासाठी गेल्यावर हा प्रकार लक्षात आला. हळूहळू त्याला आंदोलनाचे स्वरूप मिळाले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर प्रभागाचे नगरसेवक बांधकाम सभापती रवींद्र माने, महेश्ोठोके, माधुरी चव्हाण, संगीता आलासे घटनास्थळी आले. नागरिकांनी संताप व्यक्त करीत त्यांच्याकडे विचारणा केली. त्याचवेळी आरोग्यधिकारी अशोक जाधव या भागात आले तेव्हा नगरसेवकांसह नागरिकांनी त्यांना घेराव घालून धारेवर धरले. सुमारे तासभर शाब्दिक वादावादी सुरू होती. त्यानंतर आरोग्याधिकारी जाधव यांनी आरोग्य सभापतींशी चर्चा करून उद्या तातडीने फिरते शौचालय आणून देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर हा वाद संपुष्टात आला.
शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी हा प्रकार घडूनही प्रशासन अंधारातच असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकारामुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी नवी शौचालये तातडीने बांधावीत, अशी मागणी येथील नागरिकांनी केली.
या आंदोलनात श्रीकांत पाटील, राहुल कोडणीकर, पिंटू गळतगे, अमोल मावळे, विद्या केसरे, विजया कोकरे, मंगल वरूटे, बेबी किळुसकर यांच्यासह १००वर नागरिक आंदोलनात सहभागी झाले होते. वर्षभरापूर्वी बांधण्यात आलेले हे शौचालय कोणी व कशासाठी पाडले याचा शोध घ्यावा, अशी मागणी होत आहे.