राजू शेट्टींच्या निर्णयाकडे शेतकऱ्यांचे लक्ष Print

जयसिंगपूरमध्ये आज ऊस परिषद
 कोल्हापूर / प्रतिनिधी
गत हंगामातील अंतिम दर आणि यंदाच्या हंगामासाठी मजबूत पहिली उचल या मागणीमुळे गेले पंधरवडाभर उस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये जबरदस्त कुतूहल निर्माण झाले आहे. याच विषयावरून उद्या शनिवारी जयसिंगपूर येथे होणाऱ्या ११व्या ऊस परिषदेमध्ये खासदार राजू शेट्टी कोणती मागणी करणार आणि आंदोलनाची कोणती दिशा जाहीर करणार याकडे बळीराजाचे लक्ष वेधले आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दरवर्षी ऊस गळीत हंगामापूर्वी जयसिंगपूर येथे ऊस परिषद भरविली जाते. यंदा हे परिषदेचे ११वे वर्ष आहे. जयसिंगपुरातील विक्रमसिंह मैदानावर होणाऱ्या मेळाव्याची तयारी पूर्ण झाली आहे. मेळावा यशस्वी व्हावा यासाठी संघटनेच्या वतीने गेल्या काही दिवसांपासून गावोगावी सभा, बैठका, मेळावे घेऊन जोरदार जनजागृती केली आहे.
पश्चिम महाराष्ट्र व उत्तर कर्नाटक येथील ऊसउत्पादकांमध्ये याच विषयावरून चर्चा सुरू आहे. या वर्षी उसाचे प्रमाण कमी असल्याने दर चांगला मिळणार हे शेतकरी गृहीत धरून आहे. मात्र त्याला नेमका किती दर मिळावा, याविषयी अद्याप स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून भाष्य झालेले नाही. ते उद्याच्या परिषदेत होणार असल्याने शेतकऱ्यांच्या नजरा परिषदेकडे वळल्या आहेत. परिषदेला लाखांहून अधिक शेतकरी उपस्थित राहतील, असा विश्वास जिल्हा परिषद बांधकाम सभापती सावकर मादनाईक, उल्हास पाटील, अण्णासाहेब चौगुले यांनी व्यक्त केला आहे.