इचलकरंजीजवळ मॉलची मोडतोड Print

कोल्हापूर / प्रतिनिधी
इचलकरंजी व कबनूर या दोन शहरांच्या मध्यभागी असलेल्या ‘एन मार्ट’ या मॉलची अज्ञातांनी रात्रीच्या सुमारास मोठय़ा प्रमाणात मोडतोड करून प्रचंड नुकसान केले. या प्रकाराबाबत कंपनी व्यवस्थापनाने कोणत्याही प्रकारची तक्रार पोलिसांकडे केली नसल्याने कंपनी व्यवस्थापनाबद्दल उलटसुलट चर्चेला ऊत आला आहे.
इचलकरंजी-कोल्हापूर रोडवर कबनूरनजीक असणाऱ्या एन मार्ट या कंपनीचे गेल्या वर्षभारापासून मॉल सुरू आहे. शहरातील अनेक लोकांनी या कंपनीशी संलग्न राहून सभासदत्व स्वीकारले आहे.
५ हजार ५०० रुपये भरून कंपनीच्या बोनस स्वरूपात मिळणाऱ्या लाभासाठी बहुतांश लोकांनी कंपनीचे काम सुरू केले आहे. प्रत्येक सभासदाला दर महिन्याला २४० रुपयांचा मोफत किराणा माल देणार, शिवाय या रकमेपेक्षा जास्त खरेदी केल्यास वर्षांला बोनस स्वरूपाची वेगळी रक्कम देण्यात येते असे कंपनीकडून सांगण्यात येते. मात्र काही महिन्यांपासून सभासदांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही. याची तक्रार एन मार्ट कंपनीच्या वरिष्ठांकडे अनेकांनी केली आहे. परंतु त्या तक्रारींची कोणतीच दखल घेतली नसल्याने हा प्रकार घडला असावा अशी चर्चा घटनास्थळी होती.
शहर आणि परिसरातील अनेकांनी लाभापोटी या कंपनीचे सभासदत्व घेतले आहे. पण गत काही महिन्यांपासून लाभ मिळणे तर दूरच हा मॉलसुद्धा बंद आणि फारशा वस्तू तेथे नसल्याची चर्चा होत आहे.